coronavirus : अवलंबून राहण्यापेक्षा स्वाभिमानाने गावाकडे जाऊ; हे कठीण दिवस घरच्यांसोबत काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:14 PM2020-05-06T18:14:13+5:302020-05-06T18:14:45+5:30

आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर  गर्दी

coronavirus: go to the village with self-respect rather than dependence; Let's spend this difficult day with our family | coronavirus : अवलंबून राहण्यापेक्षा स्वाभिमानाने गावाकडे जाऊ; हे कठीण दिवस घरच्यांसोबत काढू

coronavirus : अवलंबून राहण्यापेक्षा स्वाभिमानाने गावाकडे जाऊ; हे कठीण दिवस घरच्यांसोबत काढू

googlenewsNext
ठळक मुद्देपरजिल्ह्यातील युवकांचे मत

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : एमपीएससीची परीक्षा देऊन भविष्य घडविण्यासाठी आम्ही औरंगाबादमध्ये आलो. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन चालू झाले आणि आमचे जेवणाचे हाल सुरू झाले. उपाशी राहून आजारी पडण्यापेक्षा गावाकडे जाऊन घरच्यांसोबत हे कठीण दिवस काढणे कधीही चांगले. गावाकडे काम करून स्वाभिमानाने जगता येईल, यामुळे आम्ही आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी आलो आहोत,  असे मत आपल्या गावाकडे परतण्यासाठी इच्छुक असलेल्या युवकांनी मंगळवारी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. 

लॉकडाऊनमुळे शहरात जे लोक अडकले आहेत. त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे शहरात राहणाऱ्या परजिल्ह्यांतील व परप्रांतांतील लोकांना आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. या नागरिकांना परत जाण्याआधी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी औरंगपुरा येथील नाथ मार्केट परिसरातील महानगरपालिकेच्या दवाखान्याबाहेर मोठी गर्दी होत आहे.  मागील ४ दिवसांपासून येथे आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. आजही येथे युवकांची मोठी रांग लागली होती. सकाळी ९ वाजता आरोग्य तपासणी सुरू झाली आणि दुपारी २ वाजता संपली. गावाची ओढ लागलेले अनेक जण रांगेत उभे आहेत. 

रांगेत उभ्या असलेल्या अमित झरमुरे या युवकाने सांगितले की, मी चंद्रपूर जिल्ह्यात राहतो. मागील ५ वर्षांपासून औरंगाबादमध्ये एमपीएससीची तयारी करीत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद झाले. घरातील छोट्या सिलिंडरमधील गॅसही संपला, एका मेसवल्याने जेवणाची सोय केली; पण किती दिवस असे राहणार? घरच्यांना मोठी काळजी पडली आहे. आता सरकारने परवानगी दिल्याने आज मी आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी आलो आहे. 
गोपाळ अक्कर या युवकाने सांगितले की, जेवणाचे खूप हाल होत आहेत.  एक वेळ खिचडी खाऊन काही दिवस काढले. मात्र, उपाशी राहून आजारी पडण्यापेक्षा आपल्या गावी जाणे मला योग्य वाटत आहे. त्यामुळे आरोग्य प्रमाणपत्र घेतले. आता आॅनलाईन माहिती भरून पोलीस प्रशासनाचे प्रमाणपत्र घेऊन गावाकडे जाणार.मिस्त्रीकाम करणारे संजय वाघमारे म्हणाले की, मी व माझी बायको येथे राहत आहोत, काम बंद पडल्याने हाल होत आहेत. घरभाडे भरण्यासाठीही पैसे नाहीत. त्याकरिता आता आमच्या नांदेड जिल्ह्यातील गावाकडे जाऊन काहीतरी काम करावे, असे ठरविले आहेत.  

१५० जणांना दिले प्रमाणपत्र : नाथ मार्केट येथील मनपा दवाखान्यात आज १५० जणांची तपासणी करण्यात आली. औरंगाबादमधून इतर शहरांत जाणाऱ्यांचा यात समावेश होता. कोरोनासंबंधित लक्षणे आहे का, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे का, शहरातील हॉटस्पॉट भागात वास्तव्यास आहे का, अशी माहिती घेतली जात होती. काही लक्षणे आढळून आली नाही तर त्यांना आरोग्य प्रमाणपत्र दिले जात होते. मागील ४ दिवसांत ४२५ पेक्षा अधिक लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यात उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश तसेच राज्यातील विदर्भ व लातूर, नांदेड आदी भागांतील नागरिकांचा समावेश आहे. त्यातही उत्तर प्रदेशातील नागरिक जास्त असल्याचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: coronavirus: go to the village with self-respect rather than dependence; Let's spend this difficult day with our family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.