coronavirus : शासकीय रुग्णालयांवर कोट्यवधी खर्च; पण रुग्णांचा ‘खाजगी’कडेच ओढा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 07:53 PM2020-08-27T19:53:11+5:302020-08-27T19:56:10+5:30
नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने कोट्यवधी रुपये खर्च करून उपचारासाठी आवश्यक सुविधा उभारली. याठिकाणी रुग्णांवर उपचारही मोफत होत आहेत. तरीही सरकारी रुग्णालयांतील खाटा रिक्त आणि खाजगी रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या, अशी परिस्थती आहे. त्यामुळे नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औरंगाबादेत गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाचा विळखा पडलेला आहे. सरकारी यंत्रणेबरोबर खाजगी रुग्णालये रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. रोज दोनशे ते तीनशेच्या घरांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेट कोविड हॉस्पिटल (डीसीएच), डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. खाजगी रुग्णालये आणि खाजगी जागेतही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय असो की चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील युद्धपातळीवर अवघ्या एक महिन्यात उभारण्यात आलेले मेट्रॉन रुग्णालय, अशा सर्वच ठिकाणी उपचाराच्या सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला.
डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी नेमण्यात आले. तरीही या शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याऐवजी खाजगी रुग्णालयांकडे रुग्णांचा अधिक कल असल्याचे खाटांच्या परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे. कारण सरकारी रुग्णालयांत खाटा रिकाम्या आणि खाजगी रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी फुल झालेल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थती का आहे, रुग्ण शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याचे का टाळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांत कोरोनाचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विमा, उपचाराची गुणवत्ता, सोयीसुविधांची परिस्थिती जाणून रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांची निवड करीत असल्याचे दिसते. रुग्णांचा खाजगी रुग्णालयांवर अधिक भरवसा असल्याचे चित्र सरकारी रुग्णालयांतील रिक्त खाटांवरून पाहायला मिळत आहे.
उपचारासाठी दाखल झाल्यानंतर बदलतो निर्णय
घाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात; परंतु येथे दाखल झाल्यानंतरही अनेक जण खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरत असल्याची परिस्थती आहे. मनपाकडून रुग्णांची अँटिजन तपासणी केली जाते. यात अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करते; परंतु अवघ्या एक ते दोन दिवसांत रुग्ण अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी करतात, अथवा खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देत असल्याचेही दिसून येत आहे.
कोणालाही माघारी पाठवीत नाही
कोणत्याही रुग्णालयाला घाटीतून माघारी पाठविले जात नाही. काही वेळा व्हेंटिलेटर उपलब्ध नसेल तरच रुग्ण खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देतो.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
सरकारी यंत्रणा सक्षम
कोरोनाच्या उपचारासाठी सरकारी यंत्रणा सक्षम आहे. हा आजार सध्या उच्च स्तरातील वर्गात अधिक आढळत आहे, तसेच आपल्याला कोरोना झाला हे कोणाला समजू नये, ही दोन कारणे खाजगी रुग्णालयात जाण्यामागे असू शकतात.
- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्ह्यातील खाटांची परिस्थिती
जिल्ह्यात ८० कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी १ हजार २७६ खाटा आहेत. जिल्ह्यात एकूण २९ डीसीएचसी असून, त्यांची १ हजार ८२९ खाटांची क्षमता आहे, तर ३ डीसीएच आहेत. याठिकाणी ७५६ खाटा आहेत. शासनाने या सगळ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला.
रुग्णालय एकूण खाटा दाखल रुग्ण रिक्त खाटा
घाटी ४५८ ३४५ ११३
जिल्हा रुग्णालय २०० १८१ १९
ईएसआयसी रुग्णालय ६५ ५५ १०
मेट्रॉन २३५ २३५ ०
एमजीएम हॉस्पिटल २७४ २२१ ५३
धूत हॉस्पिटल ७५ ७३ २
बजाज हॉस्पिटल ३४ २९ ५
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ५८ ५८ ०
एशियन हॉस्टिल ४० ३७ ३
ओरियन सिटी केअर हॉस्पिटल ३२ ३२ ०
वायएसके हॉस्पिटल ५० २५ २५
अजंता हॉस्पिटल २५ १३ १२