CoronaVirus : 'हॅलो...आवाज सून रहे हो बेटा, तुम अच्छे हो ना'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:10 PM2020-04-22T17:10:48+5:302020-04-22T18:39:18+5:30
कोरोना पॉझिटिव्ह आईची तीन दिवसांच्या मुलीसोबत व्हिडियो कॉलिंगद्वारे संवाद
- संतोस हिरेमठ
औरंगाबाद : 'हॅलो...आवाज सून रहे हो बेटा, तुम अच्छे हो ना, असे म्हणत 'ती' आपल्या अवघ्या ३ दिवसांच्या मुलीकडे नजर भरून पहात होती. हा प्रसंग होता जिल्हा सामान्य रुग्णालयातील.
कोरोनाबाधित आईने मंगळवारी नवजात मुलीसोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे संवाद साधला. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल जोगेश्वरी पश्चिम (मुंबई) येथून रुग्णवाहीकेने औरंगाबाद गाठणाऱ्या कोरोनाबाधित गरोदर महिलेची १८ एप्रिल रोजी सिजर प्रसूती झाली. या महिलेने मुलीला जन्म दिला. अशाप्रकारची देशातील दुसरी आणि राज्यातील पहिलीच प्रसूती ठरली. प्रसूतीनंतर या बाळाला कोरोनाची लागण झाली की नाही झाली, अशी चिंता सर्वांनाच होती. अखेर या नवजात शिशुचा अहवाल निगेटिव्ह आला आणि वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन अध्याय लिहला गेला.
बाळाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जन्मानंतर मुलीला आईपासून दूर नवजात कक्षात ठेवण्यात आले आहे. नवजात मुलीला डॉक्टर, परिचारिका आईचे दूध पाजत आहेत, परंतु ती आईच्या प्रेमापासून, आईच्या मायेच्या उबेपासून वंचित झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाला सामोरे जाणारी तिची आई तिच्या काळजीने चिंतेत आहे. जन्मानंतर डॉक्टरांनी शिशुचा चेहरा दाखविला होता. परंतु कोणतीही आई आपल्या लेकरापासून क्षणभरही दूर राहू शकत नाही. परंतु नियतीने या मातेवर ही वेळ आणली आहे. आईची तळमळ पाहून डॉक्टरांनी आधी मुलीचा फोटो, व्हिडीओ काढून दाखविला. त्यातून आईला समाधान झाले. परंतु मुलीसाठी तिची ओढ कायम आहे. कधी भेट होईल, अशी ती विचारणा करीत आहे. यावर तोडगा म्हणून डॉक्टर, परिचरिका यांनी मंगळवारी मोबाईल व्हिडीओ कॉलिंगद्वारे या दोन्ही माय-लेकींची भेट घडवून आणली. एक मोबाईल आईजवळ आणि दुसरा मोबाईल लहान मुलीजवल डॉक्टरांनी धरला आणि सुरू झाला दोघांचा संवाद. सुरुवातीला काही सेकंद ही माता आपल्या मुलीकडे पहातच राहिली. त्यानंतर 'हॅलो म्हणत, 'आवाज सून रहे हो, मुलीला साद घातली. 'तुम अच्छे हो ना' असे म्हणताच नवजात कक्षातील प्रत्येक जण स्तब्ध झाला.
अनेक संवाद सहज ऐकू येत नव्हते. परंतु आई आणि मुलगी एकटक एकमेकांकडे पहात होते. काही मिनिटांतच हा संवाद थांबला. आईबरोबर ही भेट घडवून आणणाऱ्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठे समाधान होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती नागरे यांच्यासह रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर, परिचारिका या बाळाची काळजी घेत आहे.
निगेटिव्ह अहवालाची प्रतीक्षा
२६ एप्रिलनंतर आई- मुलीची भेट सदर महिलेवरील उपचारास २६ एप्रिल रोजी १४ दिवास पूर्ण होतील. तेव्हा आईचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यास या आई आणि मुलीची भेट होईल, अशी आशा आहे. फोटोओळ.. कोरोनाबाधित आई आणि कोरोनामुक्त मुलीची मोबाईलद्वारे अशी भेट झाली.