CoronaVirus : आशादायक ! औरंगाबादेत कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपीच्या क्लिनीकल ट्रायलची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 06:05 PM2020-04-27T18:05:29+5:302020-04-27T18:07:02+5:30
घाटी रुग्णालयाकडून प्रस्ताव आला असून डॉ. हेडगेवार रुग्णालय, दत्ताजी भाले रक्तपेढीची सहकार्याची भुमिका
- योगेश पायघन
औरंगाबाद : कोरोनामुक्त रुग्णाचे रक्तद्राव (प्लाझ्मा) कोरोनाग्रस्त रुग्णांना दिल्यास ते औषध उपचारास सहाय्यभूत ठरत आहे. रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढून रुग्णालयातील कालवधी कमी होतो. त्यामुळे रक्तद्राव रोगनिवारणाच्या उपचार पद्धतीची चिकित्सालयीन चाचणीसाठी आवश्यक मान्यतेच्या तयारी करण्याची परवानगी राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभागाने शुक्रवारी (दि. २४) दिली. त्यासाठी घाटीला हेडगेवार रुग्णालय, दत्ताजीभाले रक्तपेढीने सहकार्याची तयारी दर्शविली आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरिरात कोव्हीड १९ विषाणूची लढणारे प्रतिद्रव्य/प्रतिजैविक (अॅण्टीबॉडीज) तयार होतात. हे रुग्ण बरे झाल्याच्या २८ दिवसानंतर इतर कोणताही आजार नसल्यास दातारुग्णाच्या सहमतीने शरिरातून रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून तो कोरोनाबाधित रुग्णाला द्यावा लागतो. यासाठी कोरोनामुक्त रुग्ण उपचाराच्या २८ दिवसांनतर रक्तदानासाठीच्या निकषांना पात्र असणे गरजेचे आहे. प्लाझ्मा थेरपीची ही क्लीनीकल ट्रायल आहे. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मान्यतेनंतर ड्रग्स कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाची (डिसीजीआय) ची मान्यता लागते.
कोरोना बाधितांवर उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात सुरु आहे. या संस्थांनी नितीविषय समितीमार्फत (इथिकल कमीटी) हा प्रस्ताव आयसीएमआरला पाठवायचा आहे. यासंबंधी मेडीसीन विभाग, विभागीय रक्तपेढी, हेडगेवार रुग्णालयाशी प्राथमिक चर्चा झाली असून आयसीएमआर, डिसीजीआय आणि इथिकल कमितीकडे प्रस्ताव पाठवत असल्याचे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी लोकमत ला सांगितले.
सिंगल प्लेटलेट डोनरची मदत
त्या अनुशंगाने सिंगल प्लेटलेट डोनरची सुविधा दत्ताजी भाले रक्तपेढीत आहे. केवळ दात्याच्या शरिरातून रक्तद्राव काढणे यामुळे शक्य आहे. प्लाझ्मा थेरपीत ४०० चारशे मिलीग्रॅम प्लाझ्मा कोरोनाग्रस्त रुग्णाला द्यावा लागणार आहे. त्यासाठी घाटी रुग्णालयाला सहकार्य करण्याची तयारी दाखवली असुन यासंबंधी पत्रही अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना देण्यात आले आहे.असे वैद्यकीय संचालक डॉ. मंजू कुलकर्णी यांनी सांगितले.
चाचणीसाठी संयुक्त प्रस्ताव
डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कोव्हीड-१९ समितीचे समन्वयक डॉ. सागर गुप्ता म्हणाले, क्लिनीकल ट्रायल आॅफ प्लाझ्मा थेरपी संबंधी घाटीच्या मेडीसीन विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्या सोबत संयुक्त प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरु आहे. आयसीएमआरच्या मान्यतेनंतर आवश्यक त्या मदतीला रुग्णालय तयार आहे. तर रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. अनंत पंढरे यांनीही याला दुजोरा दिला आहे.
उद्रेक थोपवण्यासाठीचा प्रयत्न
कोरोनावर अद्याप रामबाण औषध न सापडल्याने वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा वापर करुन कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यापैकी एक असलेल्या प्लाझ्मा थेरपीला केंद्राने राज्याला हिरवा कंदिल दाखवल्याने केरळ, दिल्ली नंतर आता महाराष्ट्रातही या रक्तद्रावातून प्रतिद्रव्य वाढवण्याच्या तंत्राचा वापर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यातून गंभीर, अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्यात मदत होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाच्या अख्त्यारीतील रुग्णालयांनी प्लाझ्मा थेरपीच्या क्लिनीकल ट्रायलची तयारी सुरु केली आहे. पुण्याच्या बीजे मेडीकल काॅलेजनंतर आता मुंबई, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातहीआयसीएमआरच्या मान्यतेनंतर औरंगाबादेतही या ट्रायल होतील. यात दात्याचा विमा व अन्न व औषधप्रशानाचीही परवानगी लागणार आहे.
पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद...
कोरोनामुक्त लोकांचे झालेल्या रुग्णांचे रक्तद्राव कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांच्या संमतीने द्यावे लागतात. रक्तद्राव दिल्याने त्यातील कोरोनाविरुद्ध लढणारे प्रतिजैविकांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांना बरे करण्यास मदत होईल. आधी पुणे, मुंबईत या चिकित्सालयीन चाचण्या सुरु करत आहोत. घाटीकडूनही आयसीएमआरच्या मान्यतेसाठी प्रयत्न सुरु आहे. मान्यतामिळताच गरजेनुसार प्लाझ्मा थेरपीचा वापर कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी करण्यात येईल.
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई