यापूर्वी किती नागरिकांना होऊन गेला कोरोना ? महापालिकेतर्फे आजपासून शहरात सिरो सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:51 PM2020-08-10T13:51:49+5:302020-08-10T13:53:53+5:30
या सर्व्हेत प्रत्येक वॉर्डाच्या लोकसंख्येनुसार चिठ्ठ्या टाकून त्या भागाची निवड करून रँडम सॅम्पल सर्व्हे होणार आहे.
औरंगाबाद : महापालिकेतर्फे कोविड १९ नियंत्रणाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनेंतर्गत सोमवारपासून शहरातील ११५ वॉर्डांमध्ये ‘सिरो सर्वेक्षण’ अँटी बॉडी टेस्ट सुरू करण्यात येणार आहे. मनपा हद्दीत १० ते १५ आॅगस्ट या कालावधीत ही टेस्ट होणार आहे. दररोज हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.
शहरातील प्रत्येक वॉर्डामधून किमान ३५ ते ४० नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी केली आहे. २० वैद्यकीय पथकांचे नियोजन केले गेले आहे. यात प्रत्येक पथकात २ डॉक्टर, १ लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट व भारतीय जैन संघटनेचा १ प्रतिनिधी असणार आहे. या सिरो सर्वेक्षणसाठी भारतीय जैन संघटनेतर्फे २० वाहनांची (बसची) व्यवस्था करण्यात आली आहे. यात २० डॉक्टर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व २० डॉक्टर एमजीएम महाविद्यालय यांच्यामार्फत मनपाला उपलब्ध होणार आहेत.
या सर्व्हेत प्रत्येक वॉर्डाच्या लोकसंख्येनुसार चिठ्ठ्या टाकून त्या भागाची निवड करून रँडम सॅम्पल सर्व्हे होणार आहे. यात प्रत्येकी १० घरांनंतर एका घरातील एका व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात येणार आहे. यात संबंधित नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडी चेक करण्यात येणार आहे. महापालिकेला दिवसभरात जमा करण्यात आलेल्या रक्ताचे नमुने घाटी रुग्णालयाला तपासणीसाठी द्यावे लागणार आहेत. १० ते १७ वयोगटातील मुलांचाही तपासणीत स्वतंत्रपणे यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. यामुळे त्यास व त्या भागातील इतर किती नागरिकांना कोरोनाची लागण यापूर्वी होऊन गेली आहे, हे कळेल. पुढील उपाययोजना आखण्यासाठी प्रशासनाला याची मदत होणार आहे.
नागरिकांनी भीती बाळगू नये
या सर्व्हेमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कोणत्याही नागरिकास क्वारंटाईन किंवा विलगीकरण केले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि या सिरो सर्वेक्षणसाठी नागरिकांनी मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.