coronavirus : शहरात मॉलिक्युलर लॅब असती तर टळली असती धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 07:16 PM2020-03-19T19:16:05+5:302020-03-19T19:17:16+5:30
साथरोगांच्या परिस्थितीत आता रुग्णांना रक्त, लाळ नमुने तपासणीसाठी मुंबई, पुणे, नागपूरकडे धाव घ्यावी लागते आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात ‘मॉलिक्युलर लॅब’ उभारण्याचे वचन २०१० साली मनपा निवडणुकीदरम्यान औरंगाबादकरांना दिले होते. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी लॅब (प्रयोगशाळा) ऐवजी डायग्नोस्टिक सेंटर उभारले. नेत्यांच्या दूरदृष्टीला स्थानिक सत्ताधाऱ्यांनी हरताळ फासल्याने साथरोगांच्या परिस्थितीत आता रुग्णांना रक्त, लाळ नमुने तपासणीसाठी मुंबई, पुणे, नागपूरकडे धाव घ्यावी लागते आहे.
शहर व परिसरातील १४ कोरोना संशयित रुग्णांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. मागील १० वर्षांत मॉलिक्युलर लॅब मनपा सत्ताधाऱ्यांनी उभारली असती तर कोरोना व्हायरससह डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या अनुषंगाने होणाऱ्या चाचण्या औरंगाबादेत झाल्या असत्या. मनपाने रेल्वेस्टेशन रोडवर जे डायग्नोस्टिक सेंटर उभारले. त्यामध्ये फक्त एक्स-रे, सिटी स्कॅनची व्यवस्था आहे. साथरोगांच्या विविध तपासण्या तेथे होत नाहीत.
काय म्हणाले होते ठाकरे...
६ आॅक्टोबर २०१० रोजी उद्धव ठाकरे म्हणाले होते, शहरातील नागरिकांना साथरोगांच्या तपासणीसाठी मुंबई, पुण्याला जाण्याची गरज पडू नये. स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया या साथरोगांचे निदान व्हावे, यासाठी मॉलिक्युलर लॅब मनपाने उभारावी. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, पण यासाठी जास्त रक्कम लागणार नाही. मॉलिक्युलर लॅबमुळे साथरोगग्रस्त रुग्णांच्या रक्त व इतर तपासणीसाठी लागणारी यंत्रणा येथेच उपलब्ध होईल. मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना या लॅबचा फायदा होईल. मुंबई, पुणे, नागपूर येथून अहवाल येईपर्यंत रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकतो. लॅबसह समांतर जलवाहिनी, शहराला रोज पाणीपुरवठा करणे, स्वच्छ भाजीमंडई बांधणे, गुंठेवारीतील घरे नियमित करणे, सार्वजनिक शौचालये बांधणे आदी उपक्रम राबविण्याचे आदेश त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले होते.
कोण होते त्यावेळेस महापौर...
अनिता घोडेले तेव्हा महापौर होत्या. मॉलिक्युलर लॅब भविष्यात सुरू करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्यानंतर कला ओझा, त्र्यंबक तुपे, भगवान घडमोडे हे महापौर झाले. विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांचाही कार्यकाळ २९ एप्रिल २०२० रोजी संपणार आहे. या १० वर्षांत एकाही महापौराने अशी प्रयोगशाळा असावी, याकडे लक्ष दिले नाही.