CoronaVirus : 'आवक घटली, उधारी फसली'; चहा टपरी बंद असल्याने पत्नीचे उपचार उसनवारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:14 PM2020-04-03T19:14:42+5:302020-04-03T19:15:20+5:30
कारखाने बंद: कामगार गावाकडे स्थलांतरीत उधारीची चिंता वाढली
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने सामाजिक अंतराने कारखाने बंद झाली असून, कामगार उपासमारी टाळण्यासाठी गावाकडे तर काही घरीच बसले आहेत. परंतु चहा, नाश्ता पुरविणाऱ्या चहा टपरी चालकांची मोठी अर्थिक कोंडी झाली आहे. महिनाभराची उधारी फसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आजारी पत्नीच्या उपचारासाठी उसनवारी सुरू असल्याची खंत राजू ढगे पाटील यांनी मांडली आहे.
कोरोनाच्या संसर्गाला थोपविण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे.परंतु त्यातही जे रोजच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात अशा व्यक्तींना तर मोठ्या गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या चहा पाण्याची व्यवस्था करण्याची संधी गत २० -२२ वर्षापासून सुरू आहे. अख्खे कुटुंब या कामात हातभार लावित आले असून, व्यवसायातून फारसी कमाई होत नाही. चहा वाटण्यापासून ते नाष्ट्याची सोय करताना मोठी कसरत करावी लागते. कंटाळून तीनही मुलांनी कारखान्यात रोजंदारीवर जात आहेत.
संचारबंदीने मुले आणि चहा टपरी चालकही घरीच असून, त्यात ढगे पाटील यांच्या पत्नीला कर्क रोगाने ग्रासले असल्याने त्यांचा उपचार तीन वर्षापासून सुरू आहे. मिळणाºया कमाईतून पत्नीचे उपचारावर खर्च भागविला जात असताना आठवड्यापासून एक कप चहा विकलेला नाही, त्यामुळे कमाईला ब्रेक लागला आहे. कारखान्यात शुकशुकाट झाला असून, चिटपाखरू रस्त्यावर फिरताना दिसत नाही. वर्दळीच्या रस्त्यावर जणूकाही स्मशानशांतता पसरली आहे. असे भयावह चित्र पाहावयास मिळत आहे.
सुट्टीत कामगार गावाकडे...
कारखान्यातील कामगार चहा, नाष्टा घेऊन जातात आणि महिन्याकाठी वसूली देतात. परंतु सुट्टीमुळे ते गावाकडे निघून गेले आहेत. १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. ते परत आले की, सोयीचे होईल,पुन्हा संचारबंदी वाढल्यास काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चहा टपरी चालकांकडेही लक्ष हवे
जिल्ह्याबाहेरील गावावरून पोट भरण्यासाठी आलेल्या विना भांडवली व्यवसाय करणाºया चहा टपरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांच्यावर आवलंबून कुटुंबाची खान्या पिण्याची तसेच आरोग्याची हेळसांड होत आहे. शासन तथा स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी,अशी मागणी आहे. - राजू ढगे पाटील