CoronaVirus : लॉकडाऊन वाढवा, पण एवढी एक गोष्ट करा; घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 04:26 PM2020-04-11T16:26:12+5:302020-04-11T17:42:46+5:30
लॉकडाऊन वाढला तर आई वडिलांना समजावणे कठीण होईल; विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
औरंगाबाद : आम्ही सरकार सोबत आहोत, आम्ही लॉकडाऊनमध्ये अडकलो असून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालनही करत आहोत.मात्र, रात्री अचानक आई- वडिलांचा काळजी ने भरलेला फोन येतो तेव्हा जीव कासावीस होतो. आता २१ दिवसांचा लॉकडाऊन वाढला तर त्यांना समजावून सांगणे कठीण जाईल. यामुळे १४ एप्रिलनंतर आम्हाला घरी जाऊ द्या, नाही तर आमचे खूप हाल होतील अशी विनंती पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांतर्फे माणिक पाटील याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
जगभरात धुमाकूळ घालत असलेले कोरोनाचे संकट देशात धडकले आणि सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन केले. यामुळे आपल्या घरापासून दूर राहणारी अनेक विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतली. मात्र काही बाहेरच्या राज्यात असलेली विद्यार्थी अर्ध्या मार्गातच अडकली. नांदेडचा माणिक गीते हा युवक दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान तोही आपल्या घरी जाण्यासाठी निघाला मात्र पुण्यात आल्यानंतर जिल्हासीमा बंद करण्यात आल्याने तो येथेच अडकला. एका मित्राने त्याला पुण्यात आसरा दिला. तेव्हा पासुन लॉकडाऊनचे २१ दिवस कधी संपतात याची वाट पाहण्यात माणिक आणि त्याचे मित्र दिवस काढत आहेत. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत आहोत मात्र १४ एप्रिल नंतर आम्हाला घरी जाऊद्या अशी विनंती सर्व विद्यार्थ्यांतर्फे माणिक पाटील ने यु ट्यूबवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अनेक पालक आणि त्यांची घराबाहेर अडकलेली मुले व्हिडीओपाहून भावुक होत आहेत.
बातम्या पाहून आई- वडिलांची चिंता वाढते
देशात कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुण्याकडे पाहिले जात आहे. इथे रोज नव्या कोरोना बाधितांची भर पडत आहे अशा बातम्या पाहून आई-वडीलांच्या चिंतेत भर पडत आहे. रात्री अचानक आईचा फोन येतो, तिचे अश्रू थांबत नाहीत. मात्र मी इथेच सुरक्षित आहे असे समजावत फोन कट करतो. अशी परिस्थिती इथे अडकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची असल्याचे माणिक व्हिडीओमधून सांगतो
जेवणाचे होत आहेत हाल
विद्यार्थ्यांना नियमित मेसवर सुद्धा पौष्टिक जेवण मिळत नाही. आतातर लॉकडाऊन आहे,यात मिळेल ते अन्न खाऊन आम्ही विद्यार्थी दिवस काढत आहोत. अनेक स्वप्न घेऊन आम्ही गाव सोडला होता मात्र अशा वातावरणात अडकल्याने सर्वांना घराची तीव्र ओढ लागली आहे अशा भावना सुद्धा माणिक व्यक्ती करतो.
लॉकडाऊन वाढला तर...
इथे अडकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना घरून रोज पाच ते सहा वेळेस फोन येतात. अत्यंत व्याकुळ स्वरात बोलणाऱ्या आईला फक्त २१ दिवसांचा प्रश्न आहे,नंतर घरीच येयचे आहे असे सर्वजण समजावून सांगत आहेत. मात्र लॉकडाऊन वाढला तर त्यांना समजावून सांगणे अवघड जाईल. त्यासोबत आमचेही हाल खूप बेकार होतील असेच चित्र आहे. यामुळे १४ एप्रिलनंतर आम्हाला घरी जाऊ द्या अशी विनंती अशाच पद्धतीने अडकलेल्या विद्यार्थ्यांतर्फे माणिकने केली आहे.