CoronaVirus : लॉकडाऊन वाढल्याने परप्रांतीयांमध्ये अस्वस्थता; तहसील प्रशासनाकडून शिबिरांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 07:39 PM2020-04-15T19:39:14+5:302020-04-15T19:45:31+5:30
शिबीरातील मजुरांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
पैठण : आपल्या राज्यात परत जाण्यासाठी लॉकडाऊन संपण्याची वाट पाहणाऱ्या परप्रांतीय मजुरांत लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने अस्वस्थता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाच्या वतीने आज पैठण तालुक्यातील परप्रातीय मजुरांच्या विविध शिबीराची पाहणी करण्यात आली.
शिबीरातील मजुरांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशासन मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याची व्यवस्था करेल मजुरांनी कुठलाही आततायीपणा करू नये असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
पैठण तालुक्यात विविध राज्यातून १६३० मजूर कामासाठी आलेले आहेत. या पैकी मध्यप्रदेश राज्यातून १५१३ मजूर पैठण तालुक्यात वीटभट्टी कामासाठी आलेले आहेत. एकूण कामगाराच्या ९३% मजुर हे मध्यप्रदेशातील आहे. या शिवाय उत्तर प्रदेश, बीहार, राजस्थान, कर्नाटक व झारखंड येथील कामगार आहेत. या सर्वांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने १५ शिबीरात करण्यात आली आहे. या शिबिराचे स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तीना पालकत्व देण्यात आले आहे.
पैठण येथील शिबीरात ५६२, मुधलवाडी ५४, औद्योगिक वसाहत पैठण २३, पाचोड २४०, पाटेगाव १३०, बीडकीन ६३२, थेरगाव १६ व बोकूड जळगाव येथील शिबीरात ३७ परप्रांतीय मजुरांची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान या शिबीरातील मजुरांची लॉकडाऊन कालावधी वाढल्याने अस्वस्थता वाढल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी औरंगाबाद यांनी शिबीरात जाऊन या मजुरांना दिलासा द्यावा अशा सूचना दिल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. दरम्यान आज तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी पैठण तालुक्यातील विविध शिबीरात जाऊन मजुरांशी हंवाद साधला, मजुरांच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांना दिलासा दिला.
परप्रांतीय मजुराच्या शिबीराचे पालकत्व
काकासाहेब बरवे, सचिन भालसिंग, संदिप आहेर, राजुभाई वीटभट्टीवाले, पवन शिसोदे, मालू वीर, जुबेर टेकडी, सयद टेकडी, राम पंजावाले, गणेश पंजावाले, विठठल कृपा जिंनिग आणि प्रेसिंग, पेरे गुरुजी, एल आणि टी कंपनी ( श्री पत्रा ), सरोवती इलेक्ट्रीकल थापटी व सयद हसन यांनी स्विकारले आहे. प्रशासन या शिबीरातील व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे.
पैठण तालुक्यातील परप्रातीय मजुरात कुठलीही अस्वस्थता नसल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.