coronavirus : पैठणमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या वाढली; स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 06:57 PM2020-05-07T18:57:03+5:302020-05-07T18:58:35+5:30
गुरूवारी रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना पुन्हा दोन दिवस थांबण्याची वेळ आल्याने या मजुरांचा मोठा हिरमोड झाला आहे.
पैठण : तालुक्यातून मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या वाढल्याने या मजुरासाठी येत्या दोन दिवसात स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज दिली.
गुरूवारी औरंगाबादरेल्वे स्थानकातून सायंकाळी भोपाळला रवाना झालेल्या रेल्वेद्वारे पैठण तालुक्यातील ५८१ मजुरांना मध्यप्रदेश राज्यात पाठविण्यात येणार होते. परंतु, या रेल्वेत पैठणच्या मजुरांसाठी २०० आसन शिल्लक राहिले होते. त्यातच पैठण तालुक्यातून मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी प्रशासनाकडे १००० पेक्षा जास्त मजुरांनी नोंदणी केल्याने पैठण तालुक्यातील मजुरासाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. येत्या दोन दिवसात स्वतंत्र रेल्वे सोडण्यात येणार असून १२०० मजुर या रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात परत जातील असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
पैठण तालुक्यात विटभट्टी व जिनिंग साठी मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेशातील मजुर येतात. आज रोजी मध्यप्रदेशातील १५२४ पेक्षा जास्त मजुर पैठण शहरात आहेत. काही मजूर तालुक्यात आहेत. लॉकडाऊन परिस्थितीत या मजुरांची प्रशासनाने विविध कँप मध्ये व्यवस्था केलेली आहे. यापैकी १२०० मजुरांनी त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे.
पैठण तालुक्यातून बऱ्हानपूर ०६, खांडवा ९००, बडवणी २२, बालाघाट, ३४, मंडाला ०७, बीरसा ०५, संटाना ०२, भुनापूर ०२, बैतूल १९ खरगांव या जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त मजुरांनी परत जाण्यासाठी प्रशासनाकडे नोंदणी केलेली आहे. पैठण तालुक्यातील मजुरांची एका रेल्वेची प्रवासी संख्या पूर्ण होत असल्याने स्वतंत्र रेल्वे द्वारे या मजुरांना परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
दरम्यान गुरूवारी रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना पुन्हा दोन दिवस थांबण्याची वेळ आल्याने या मजुरांचा मोठा हिरमोड झाला आहे.