coronavirus: रुग्णांच्या भोजन खर्च तफावतीची तपासणी, आरोग्यमंत्र्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:53 AM2020-07-10T06:53:14+5:302020-07-10T06:53:54+5:30
. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणारा आहार व त्यावरील खर्चात फरक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत उघडकीस आले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या भोजनावरील खर्चाच्या तफावतीची गंभीर दखल घेत त्याची तपासणी करण्याची सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
गुरुवारी टोपे यांनी बैठकीत कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणारा आहार व त्यावरील खर्चात फरक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत उघडकीस आले. हा प्रकार ९ जुलैला ‘कोरोना रुग्णांच्या भोजनावरील खर्चाला वाढीव दराची फोडणी’ या मथळ््याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. याविषयी टोपे म्हणाले, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, जी दर तफावत आहे ती तपासण्यात यावी. जास्त दर देऊन निकृष्ट अन्न मिळत असेल, तर त्याचीही तपासणी करावी आणि त्याचा अहवाल मला कळविण्याची सूचना जिल्हाधिकाºयांना केल्याचे त्यांनी सांगितले. क्वॉरंटाईन सेंटर कैदखाणे वाटू नयेत, अशा सुविधा देण्याचीही सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली. जिल्हा रुग्णालयात रोज नाश्ता, जेवणापोटी प्रतिव्यक्ती ११० रुपये दर आहे. मनपा केंद्रात प्रतिव्यक्ती प्रतिदिन हा खर्च २१० रुपये आहे, तर ग्रामीण भागांतील केंद्रात २१३ रुपये होत आहे. घाटीत प्रतिव्यक्ती ७० रुपये खर्च होतो. मनपा आणि ग्रामीण केंद्रांवरील खर्चात १०० रुपयांचा फरक आहे.
दोन महिन्यांत दर वाढत गेले
कोरोना रुग्णांच्या जेवणासाठी महापालिकेने दोन महिन्यांत वारंवार ठेकेदार बदलले. सुरुवातीला प्रतिव्यक्ती प्रतिदिन १५० रुपये, अशी रक्कम दिली जात होती. ती वाढून २१० रुपयांवर गेली. या सगळ््यात नेमके कोणाचे साटेलोटे आहे, हे तपासणीतून समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.