coronavirus : औरंगाबादेत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:12 PM2020-06-20T19:12:19+5:302020-06-20T19:15:59+5:30

रुग्णाला शोधून काढणे, विलगीकरण, तपासणी, उपचार या चार बाबींवर सर्वाधिक भर देण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

coronavirus: Kerala pattern to control the number of corona patients in Aurangabad | coronavirus : औरंगाबादेत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळ पॅटर्न

coronavirus : औरंगाबादेत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळ पॅटर्न

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न११८ मंगल कार्यालये ताब्यात घेणार

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १७ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात दररोज शंभर रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी महापालिकेने केरळ पॅटर्नचा अवलंब केला आहे. यामध्ये रुग्णाला शोधून काढणे, विलगीकरण, तपासणी, उपचार या चार बाबींवर सर्वाधिक भर देण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. 

१ जूनपासून लॉकडाऊनमध्ये हळूहळू सूट देण्यात आली. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज जवळपास १०० रुग्ण आढळत आहेत. पत्रकारांशी  बोलताना  पाण्डेय  यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या वाढू न देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. त्यांनी सुरक्षित वावर, मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे हे नियम पाळले तर रुग्णसंख्या वाढणार नाही. काही खासगी संस्थांच्या माध्यमातून शहरातील संभाव्य रुग्णसंख्येबद्दल सर्वेक्षण करून अंदाज व्यक्त केला होता.  शहरात ९ जूनपर्यंत रुग्णसंख्या २१ हजार होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. सध्या औरंगाबादमध्ये रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. रुग्णसंख्या वाढू न देण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे.

२० मेपर्यंत संस्थात्मक विलगीकरण करण्यावर महापालिकेने सर्वाधिक भर दिला होता. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. केरळमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी  चांगली प्रणाली  अवलंबिण्यात आली. याच प्रणालीचा अवलंब औरंगाबादेत करण्यात येत आहे.  ट्रेस, आयसोलेट, टेस्ट  ट्रीट या चतु:सूत्रीवर ही पद्धत आधारित आहे. मुंबईत ट्रेस,  टेस्ट, आयसोलेट ही पद्धत अवलंबली जाते, असे त्यांनी सांगितले. क्वारंटाईनचे प्रमाण वाढवून त्यातून वाढत्या रुग्णसंख्येला आळा घातला जाईल, असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.

११८ मंगल कार्यालये ताब्यात घेणार
क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये चार हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन हजार क्वारंटाईन बेड आहेत, अशी माहिती देताना आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, भविष्यात क्वारंटाईन करावयाच्या व्यक्तींची संख्या वाढलीच, तर निवासाची व्यवस्था अपुरी पडू नये म्हणून महापालिकेच्या नऊ झोनच्या कार्यक्षेत्रात असलेली ११८ मंगल कार्यालये ताब्यात घेतली जाणार आहेत. 

सोमवारनंतर स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू होईल
कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने अवघ्या काही दिवसांमध्ये चिकलठाणा एमआयडीसी भागात स्वतंत्र कोविड रुग्णालय उभे करून मनपाच्या ताब्यात दिले आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याचे थोडेसे काम शिल्लक आहे. २२ जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. तोपर्यंत महापालिकेची कंत्राटी पद्धतीवरील भरती प्रक्रिया पूर्ण होईल. रुग्णालय लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली. कोरोना आजाराचा मुकाबला करताना शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी १० हजार रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. आजही शहरात ७०० रुग्ण उपचार घेत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लसींचा वापर करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात ही लस उपलब्ध आहे. एकही रुग्ण रस्त्यावर नाही. महाराष्ट्र शासनाने अत्यंत कमी कालावधीत औरंगाबादकरांसाठी चांगले सुसज्ज रुग्णालय उभे करून दिले आहे. ते लवकरच सुरू होईल.

रुग्ण दाखल न केल्याची तक्रार
शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यासंदर्भात गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपातील एका अधिकाऱ्याची यासंदर्भात समिती नेमली जाणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. 

उपलब्ध बेडची माहिती घरबसल्या
शहरातील कोणत्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध आहेत, याची माहिती संबंधित रुग्णालयांनी एलईडी स्क्रीनवर लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश रुग्णालयांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. ४नागरिकांना घरबसल्या उपलब्ध बेडची परिस्थिती पाहण्यासाठी महापालिकेचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.  दिवसभरातून तीन वेळेस यातील माहिती अपडेट करण्यात येते.

Web Title: coronavirus: Kerala pattern to control the number of corona patients in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.