CoronaVirus : लॉकडाऊनमुळे तोंडालाच 'लॉक'; अख्खी रामपूरवाडी भागवतेय पाण्यावर भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 10:10 AM2020-03-30T10:10:23+5:302020-03-30T10:12:32+5:30

घराबाहेर पडू नका सांगतात,जेवलात का अस कोणी विचारत नाही

CoronaVirus: 'lock' to mouth only due to lockdown; Appetite over water is running all over Rampurwadi | CoronaVirus : लॉकडाऊनमुळे तोंडालाच 'लॉक'; अख्खी रामपूरवाडी भागवतेय पाण्यावर भूक

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे तोंडालाच 'लॉक'; अख्खी रामपूरवाडी भागवतेय पाण्यावर भूक

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दिवसात संपले अन्नधान्यलहान मुलांना मक्याची कणसे देऊन भूक शमवतातकधी कधी मिळतो रानमेवा

सोयगाव : हातांना काम नाही, आठवडा घरातच बसून निघून गेला, यात घरात होता तेवढा किराणा संपल्यावर मात्र तीन दिवसापासून चक्क पाण्यावर भूक भागविण्याची वेळ सोयगाव तालुक्यातील रामपूरवाडी गावावर आली आहे. यामुळे येथील  आदिवासी ग्रामस्थ एकमेकांच्या तोंडाकडे पाहत केवळ पाणी पिऊन झोपी जात आहेत. गावात शासनाची लोक बाहेर पडू नका म्हणून येतात मात्र जेवलात का असे कोणी विचारात नसल्याची खंत ग्रामस्थ बोलून दाखवतात. 

कोरोनामुळे शासनाची संचारबंदी आणि जनजागृती उल्लेखनीय आहे.परंतु लॉकडाऊनच्या फटक्यात मात्र आदिवासी रामपूरवाडीच्या ग्रामस्थांचे पोट रिकामे आहे त्याचे काय ? आत आम्हाला मरण द्या हीच मागणी असल्याचे ग्रामस्थांनी निराशेने सांगितले .सोयगाव तालुक्यातील या आदिवासी गावात भयावह स्थिती निर्माण झाली आहे.घरात एकवेळचा किराणा भुसार नाही,पहाटे उठल्यावर केवळ तोंड धुवून हात बांधून बसावे लागते। कारण त्यांच्याकडे एकवेळचं चहाचे सुद्धा साहित्य उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४०० ते ५०० लोकवस्तीचे हे गाव सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गाला लागुनच आहे.या मार्गावरून जिल्हा पातळीवरील अनेक विभागाचे अधिकारी कोरोना संसर्गाच्या उपाय योजनेसाठी जातात मात्र या गावात मात्र अद्याप कोणीही निरखून पाहिलेले नाही. गैरसोयी तर दूरच परंतु या आदिवासी ग्रामस्थांना पोटासाठी तुकडा सुद्धा मिळत नसल्याने ग्रामस्थ शासनाच्या संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या विळख्यात मरणाच्या दारात उभे आहेत .रविवारी लोकमत प्रतिनिधीने येथे भेट दिली. तेव्हा घरात भाकरीचे पीठही नसल्याचे वास्तव समोर आले होते, त्यामुळे चुलीच पेटलेल्या नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. लोकमतने या गावाचा जवळून आढावा घेतला असता,गावातील आदिवासींच्या चुली तीन दिवसापासून पेटलेल्या नव्हत्या आणि शेजारील एका शेतातून अवकाळी पावसात नुकसान होवून आडव्या झालेल्या मक्याच्या कणीस भाजून काही लहान बालकांना या गावातील ग्रामस्थांनी खाऊ घालून झोपी घातले असल्याचे सांगितले. 
 
हंडाभर पाण्यावर कुटुंब भागावातेय भूक
पाण्यावर तहान भागविली हे आपण ऐकले असेल,परंतु चक्क पाण्यावर भूक भागवावी लागते हे ऐकल्यावर तुमच्या अंगाला काटाच उभा राहील,हि सत्य परिस्थिती आहे.आदिवासी रामपूर वाडी गावाची दिवसभर हंडाभर पाणी जवळ घेवून अख्खे कुटुंब लहान बालकांसह या पाण्यावर भूक भागवीत आहे जंगलात रानमोळा घेण्यासाठी जाता येत नाही आणि घरात साहित्याचा तुटवडा त्यामुळे अन्ना विना या ग्रामस्थांना राहावे लागत आहे.

कधीकधी मिळतो रानमेवा
पोटात अन्नाचा कण नसलेल्या गावातील तरुण मंडळी मात्र रानात दुपारच्या सुमारास जावून रानमेवा गोळा करून आणतात व त्यावर काही कुटुंब आणि लहान बालकांची गुजराण चालू आहे.परंतु रानातही किती दिवस रानमेवा भेटणार याचीच चिंता काहींना लागून आहे.

मायबापांन्नो ह्यों कोणता रोग आणलाय आम्हाला भाकर भेटेना हा रोग होण्याच्या आधी मला मरण आले पाहिजे तीन दिवसापासून अन्न कसे असते हे या पोटाने पाहिलेले नाही.सगळे पोऱ्ह,बाया पाणी पिवून झोपता रे - सुंदराबाई सोनवणे

दुकाने बंद झाली...पोलीस गावात येतात पण फिरू नका म्हणतात पण जेवालिका हे कोणीच पुसत नाही रे भाऊ.......दोन दिवसात मी मरणारच आहे.पण माझ्या या लेकरांकडे लक्ष ठेवा म्हणजे झाल 
- सयाबाई सोनवणे

पहाटे उठल्यावर चहाबी भेटत नाही साहेब परवाच्या रात्रीला भाकरीचा तुकडा खाल्ला अजीनही तशीच आहे.....कोणता रोग आणलाय आणि आमची भाकरच बंद झाली भाऊ - 
- म्हाळसाबाई पवार

घरात कोणालाच कामे नाही काय खायचे त्यामुळे घरातच उपाशी पोटी बसून आहे.....शनिवारी सकाळी जेवण केले अजून पोटात अन्नाचा कण नाही किती दिवस असा ठेवणार.
- सीताबाई सोनवणे

निराधार पगार मिळत होता त्यावर मी एकटी उदरनिर्वाह करत होती पण आता त्योबी भेटेना दुकानदार उधार सामान देत नाही काय करावे.
- जयवंताबाई ठाकरे


तात्काळ मदत करू
तालुक्यात मार्च अखेरीसचा धान्य साठा शंभर टक्के वितरीत करण्यात आल आहे.त्यामुळे धान्याची चणचण अशी तक्रार अद्याप पावेतो प्राप्त नाही.रामपूर वाडी बाबत आजच माहिती मिळाली या गावाला सोमवारी प्रत्यक्ष भेट देवून येथील नागरिकांना उधारीवर किराणा सामान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शासनाने कोरोना बाबत जाहीर केलेल्या पॅकेज मधून किराणा सामानाचे देयके दुकानदाराला देण्यात येईल या गावात निराधार योजनेच्या लाभार्थी असेल तर त्याची माहिती घेवून तातडीने या लाभार्थ्यांना संचार बंदीत स्वतंत्रपणे तातडीने मदत म्हणून निधी वितरण करू.
- प्रवीण पांडे,तहसीलदार सोयगाव 

Web Title: CoronaVirus: 'lock' to mouth only due to lockdown; Appetite over water is running all over Rampurwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.