coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:42 PM2020-05-22T19:42:46+5:302020-05-22T19:48:34+5:30

 परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

coronavirus lockdown: Ignoring children in Maharashtra trapped in Kyrgyzstan | coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष

coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देविमान लँडिंगची परवानगी नाही अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांची व्यवस्था

औरंगाबाद : किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल आॅफ मेडिसिन (आयएसएम)मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे औरंगाबादसह राज्यभरातील अनेक विद्यार्थी कोरोनामुळे अडकून पडले आहेत. देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी परतत आहेत; परंतु विमानसेवेअभावी महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 

महाराष्ट्र राज्यात विमान उतरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे दिल्लीतील अधिकारी पालकांना सांगत आहेत. त्यामुळे मुलांच्या चिंतेने पालक लोकप्रतिनिधींकडे मदत मागत आहेत. परंतु आश्वासन आणि दिल्लीकडे बोट दाखविण्यापलीकडे काहीही होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलांच्या काळजीने पालक वारंवार विदेश मंत्रालयास संपर्क साधत आहेत. परंतु त्यांच्याकडून महाराष्ट्राकडे बोट दाखविले जात आहे. महाराष्ट्रामध्ये विमान उतरण्यास परवानगी दिली जात नसल्याचेच विदेश मंत्रालयाकडून पालकांना सांगितले जात आहे. कोरोनाच्या काळात अनेक प्रकारची मदत केली जात असल्याचे दावे सरकारकडून केले जात आहेत; परंतु परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

बिश्केक येथील आयएसएममध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून वसतिगृह आणि फ्लॅटमध्ये अडकून पडलेले आहेत. ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी वसतिगृहात आणि पुढील वर्षातील विद्यार्थी फ्लॅटमध्ये राहतात. येथील लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना जेवणासह अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे.हताश झालेले विद्यार्थी पालकांशी संपर्क साधत आहेत. घरी येण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करीत आहेत. 
औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २५ विद्यार्थी तेथे असल्याचे सांगितले जात आहे. राज्यभरातील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती आहे. त्यांचे पालक लोकप्रतिनिधींसह शासनाचे लक्ष वेधत आहेत. राज्य सरकारसह भारत सरकारकडे त्वरित प्रयत्न करण्याची मागणी हे पालक सतत करीत आहेत. 

महाराष्ट्रासाठी एकही विमान नाही
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथून १३ जूनपर्यंत भारतासाठी विमान सोडण्यात येणार आहे; परंतु यात महाराष्ट्रासाठी एकही विमान नाही. अन्य राज्यांच्या विमानात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार नाही. शहरातील आणि राज्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावा. 
- डॉ. अनिल पाटील चिकटगावकर, विद्यार्थ्याचे पालक 

Web Title: coronavirus lockdown: Ignoring children in Maharashtra trapped in Kyrgyzstan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.