CoronaVirus : औरंगाबादमध्ये प्रथमच मरकज कनेक्शन; दुसऱ्यांदा स्वँब घेतल्यावर तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:43 PM2020-04-11T19:43:21+5:302020-04-11T19:44:21+5:30
मरकज येथून परतलेले सर्वजण क्वारंटाईनमध्ये
औरंगाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकज मध्ये गेलेल्या एका भाविकाला कोरोना ची लागण झाल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आले. औरंगाबाद येथून मरकजला गेलेल्या भाविकांना शोधून पोलिसांनी महापालिकेच्या ताब्यात दिले होते. महापालिकेने या भाविकांना कलाग्राम येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. पहिल्यांदा जेव्हा नऊ भाविकांचे लाळेचे नमुने घेण्यात आले तेव्हा एकाही भाविकाला कोरोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने अलीकडेच मरकज येथे गेलेल्या भाविकांचे दुसऱ्यांदा पुन्हा लाळेचे नमुने घेऊन तपासावेत अशी सूचना देण्यात आली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने औरंगाबादमध्ये सापडलेल्या सर्व भाविकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील 29 वर्षीय एका भाविकाला कोरोना आजाराची लागण झाल्याचे आज रात्री अहवालात उघडकीस आले. रात्री उशिरा महापालिकेच्या आरोग्य विभागाला या अहवालाची माहिती देण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे नमूद केले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले की शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मरकज येथील एका भाविकाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. हा 29 वर्षीय रुग्ण हडको एन 11 परिसरातील यादव नगर येथील रहिवासी आहे. शनिवारी रुग्णाच्या घरापासून 100 मीटर पर्यंतचा परिसर पोलिसांच्या मदतीने सील करण्यात आला आहे.
कॉन्टॅक्ट हिस्टरी तपासणी सुरू
यादव नगर येथील 29 वर्षीय रूग्ण मागील काही दिवसांपासून महापालिकेने ठेवलेल्या विलगीकरण कक्षात होता. दरम्यानच्या काळात किंवा त्यापूर्वी या रुग्णाच्या संपर्कात किती नातेवाईक होते. बाहेरच्या कोणकोणत्या व्यक्तींना तो भेटला यासंबंधीची हिस्टरी तपासण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली.