CoronaVirus : कोरोनाच्या फटक्याने दुग्ध व्यवसायिक शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:55 PM2020-03-30T15:55:10+5:302020-03-30T15:57:17+5:30
दुधाच्या भावात झाली मोठी घसरण
कन्नड - कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊन चा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला असून हा व्यवसाय आता संकटात सापडला आहे. पर्यायाने जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
तालुक्यातील चिखलठाण हे सुमारे ६ हजार ५०० लोकवस्तीचं गाव. मुख्य व्यवसाय शेती.एकेकाळी ऊसाचे माहेरघर असलेलं हे गाव. आता मात्र या गावात दुधगंगा वाहते आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. गावातील सुशिक्षित शेतकरी तरुणांनी तीन वर्षापूर्वी मुक्त गोठा संकल्पना अंमलात आणण्यास सुरुवात केली.आज या गावात सुमारे २० मुक्त गोठे आहेत. प्रत्येक गोठ्यात किमान चार पासुन दहा दुभत्या संकरीत गायी आहेत. कमीत कमी ८ लिटर ते जास्तीत जास्त ४० लिटर दुध देणाऱ्या गायी गोठ्यात आहेत. सुमारे २०० लिटर दुधाचे उत्पादन घेणारे शेतकरी ही या गावात आहेत. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याने साहजिकच दुधसंकलन केंद्रांची संख्या वाढली. पूर्वी या गावात महानंदची एक सहकारी दुध संकलन संस्था होती. त्यानंतर दुसरी महिला सहकारी दुध संकलन संस्था सुरू झाली. मात्र दुधाचा उत्पादन वाढत गेले आणि दुधाला मिळणाऱ्या भावात चढाओढ सुरू झाली. परिणामी गावात सहा खाजगी दुधसंकलन केंद्र सुरू झाले.सर्व दुधसंकलन केंद्रावर मिळून दररोज सकाळी चार ते साडेचार हजार लिटर तर सायंकाळी तीन ते साडेतीन हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते.
पूर्वीची परिस्थिती साडेतीन फॅटच्या दुधाला ३२ रु.लिटर भाव मिळत होता. दर १० दिवसाला दुधाचे पेमेंट मिळत होते.यामुळे जोडधंदा म्हणुन सुरु केलेला दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसायाची जागा घेऊ लागला होता. आगामी दोन वर्षात या गावातुन दररोज सुमारे १५ हजार लिटर दुधाचे उत्पादन होईल असा अंदाज होता व आहे.
सद्य परिस्थिती
दुध संकलन केंद्रावर ७५ टक्केच दुध खरेदी केले जात आहे. तर महानंद च्या केंद्रावर दुध संकलन बंद आहे. दुधाच्या भावात लिटरमागे १२ रुपयांची घसरण असुन २० रुपये लिटरप्रमाणे दुध खरेदी केले जात आहे. दुधाचे पेमेंट ३० दिवसानंतर मिळणार आहे असे सांगण्यात येत आहे.
शेतकरी संकटात
सध्या दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर गायीचा सांभाळ करावा लागत आहे.परिणामी या व्यवसायात उतरणारे तरुण या व्यवसायात उतरणार नाहीत अशी प्रतिक्रिया दुधउत्पादक किरण चव्हाण यांनी दिली.