CoronaVirus : 'मंत्री सुटले कार्यकर्ते अडकले'; गर्दी जमवून विकास कामांच्या उद्घाटनात पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 06:08 PM2021-05-10T18:08:34+5:302021-05-10T18:09:36+5:30
CoronaVirus : दि. ५ रोजी पैठण तालुक्यातील देवगाव येथे रोहयोच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मोठ्या संख्येने गर्दी जमवून थाटामाटात करण्यात आले होते.
पैठण : राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते देवगाव ता. पैठण येथे लॉकडाउन मध्ये गर्दी जमवून विकास कामाचे उदघाटन केल्या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात देवगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अन्य अशा पाच जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात मंत्री सुटले व कार्यकर्ते अडकले अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
दि. ५ रोजी पैठण तालुक्यातील देवगाव येथे रोहयोच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मोठ्या संख्येने गर्दी जमवून थाटामाटात करण्यात आले होते. कोरोना काळात लॉकडाउन सुरू असताना राज्याचे जबाबदार मंत्री अशा प्रकारे गर्दी जमवून विकास कामे करत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सविस्तर वृत्त छायाचित्रासह लोकमत मधून प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर सदर प्रकारा बाबत जनसामान्यातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी याबाबत मंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी आयपीएस पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्याकडे करण्यात आली होती.
दरम्यान, रविवारी या प्रकरणी देवगाव ता. पैठण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विशाल वानखेडे यांनी या बाबत पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि ४ रोजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण येथील कार्यालयातून देवगाव येथे मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन व रोहयोच्या कामाचे उदघाटन करण्यासाठी मंत्री महोदय येणार असल्याचे मला फोन करून सांगण्यात आले. यानंतर देवगावच्या सरपंच मंगलताई रामलाल कोठुळे या आजारी असल्याने त्यांचे पती व ग्रामपंचायत सदस्य रामलाल कोठुळे व उपसरपंच बाळू भगवान गीते यांना मंत्री महोदयांच्या हस्ते औपचारिक उदघाटन होणार असून या प्रसंगी गर्दी होऊ देवू नका असे त्यांना स्पष्ट कळवले होते.
कार्यक्रम सुरू असताना अचानक ग्रामपंचायत सदस्य रामलाल गुलाब कोठुळे, बाळू भगवान गीते, पाटीलबा बोंद्रे, भास्कर गीते, दीपक ढाकणे हे लोकांना घेऊन कार्यक्रम स्थळी आले. यावेळी त्यांनी मंत्री भुमरे यांचा सत्कार करून नियमाचे उल्लंघन केल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे फिर्यादीत ग्रामसेवकाने म्हटले आहे. या फिर्यादीवरून (सरपंच पती ) रामलाल गुलाब कोठुळे, (उपसरपंच) बाळू भगवान गिते, कार्यकर्ते पाटीलबा बाबुशा बोंद्रे, भास्कर अर्जुन गिते, दिपक महादेव ढाकणे यांच्या विरोधात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास हेड कॉन्टेबल रावसाहेब आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.