Coronavirus: पीपीई किट घालून आईचा बाळासाठी कोरोनाशी लढा, मरणाच्या दाढेतून सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:06 AM2021-05-25T09:06:59+5:302021-05-25T09:07:49+5:30
Coronavirus: आई-वडील दोघेही निगेटिव्ह आले. पण बाळ कोरोनाबाधित, तेही दुसऱ्यांदा. उपचार कसे करायचे, हा प्रश्न होता. पण आईने पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबाद : आई-वडील दोघेही निगेटिव्ह आले. पण बाळ कोरोनाबाधित, तेही दुसऱ्यांदा. उपचार कसे करायचे, हा प्रश्न होता. पण आईने पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांचे विविध उपचार आणि पीपीई किट घालून बाळाच्या आईने दिलेली साथ बाळाला मरणाच्या दाढेतून बाहेर घेऊन आली.
नांदेड येथे एक २ वर्षांचे बाळ रुग्णालयात भरती झाले. हे बाळ कोरोनामुक्त झाले होते. मात्र, कोविडनंतरही खूप ताप येणे, कमी रक्तदाब, मेंदूज्वर, आतड्यांवर सूज, लघवी कमी होणे असे सगळे त्रास होत होते. डॉक्टरांनी उपचाराचा प्रयत्न केला. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांनी बाळाला औरंगाबादला नेण्याचा सल्ला दिला. बहुतांश अवयव निकामी झालेल्या अवस्थेत हे २ वर्षांचे बाळ ५ मे रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल पाठक यांनी बाळाला दाखल करून घेतले.
बाळ कोरोनामुक्त आहे, असे सांगितले होते. तरीही उपचारांना सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने ते पॉझिटिव्ह आले. कोरोनामुळे बाळावर नॉर्मल वॉर्डमध्ये उपचार करता येणार नव्हते. बाळाच्या आई आणि बाबांचीही तपासणी करण्यात आली. दोघेही निगेटिव्ह आले. बाळाजवळ थांबण्याचा प्रश्न होता. मात्र, आईने पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयानेसुद्धा परवानगी दिली.
अवघ्या ८ दिवसांत बाळ नॉर्मल
अवघ्या ८ दिवसांत बाळ नॉर्मलवर आले. डॉक्टरांचे विविध उपचार आणि पीपीई किट घालून बाळाच्या आईने दिलेली साथ बाळाला मरणाच्या दाढेतून बाहेर घेऊन आली. आई-बाबा तर सुखावलेच, पण डॉक्टरांच्या संपूर्ण पथकालाही आनंद झाला. १० दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर बाळाला घरी सोडण्यात आले.