CoronaVirus : नवे आव्हान ! प्रसूतीनंतर बाळाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालय दक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 02:05 PM2020-04-17T14:05:11+5:302020-04-17T14:08:15+5:30
प्रसूतीनंतर शिशूला ठेवणार कोरोना पॉझिटिव्ह मातेपासून दूर
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह गरोदरमाता दाखल आहे. जिल्हा रुग्णालयासमोर एक आव्हान उभे राहिले असून, प्रसूतीनंतर या महिलेचे शिशू कोरोनामुक्त राहील, यासाठी विविध खबरदारी घेतली जात आहे. एक नवे आव्हान जिल्हा रुग्णालयासमोर उभे राहिले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित गरोदरमातेची कोणत्याही क्षणी प्रसूती होण्याची चिन्हे आहे. त्यामुळेच येथील प्रत्येक डॉक्टर आणि कर्मचारी दक्ष झाला आहे. शिशूला जन्मजात कोरोना लागण होण्याची ९९ टक्के शक्यता नाही. परंतु खबरदारी म्हणून जन्मानंतर शिशूची कोरोना तपासणी केली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शिशूला मातेपासून वेगळे केले जाणार आहे. स्तनपान करताना शिंक, खोकला यातून शिशूला बाधा होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे ही खबरदारी घेतकी जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रसूती सुकर होण्यासाठी येथील डॉक्टर विविध खबरदारी घेत आहे. त्यासोबत डॉक्टर, कर्मचारी सुरक्षित राहील, याकडेही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. प्रसूतीसाठी काही अडचण आल्यास घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागानेही मदतीची तयारी दर्शवली आले. लंडन, दिल्लीत अशी प्रसूती झाल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. जगभरात मोजक्याच गरोदरमातांना कॊरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील ही प्रसूती आणि शिशूला कोरोनामुक्त ठेवणे, याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
वेगळे ठेवूनही मातेचे दूध पाजणार
शिशूला मातेपासून दूर नवजात शिशू विभागात ठेवले जाईल. परंतु शिशूला मातेचे दूध पाजण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.