CoronaVirus News: कोरोना संसर्ग वाढल्याने उद्योगांत चिंतेचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 12:52 AM2021-02-21T00:52:59+5:302021-02-21T00:53:10+5:30
काेरोना उपाययोजनांचे पालन करण्याचा विश्वास
औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील उद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, काल ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’ आणि ‘मासिआ’ या उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांची भेट घेत सर्व उद्योगांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजना करण्याचा विश्वास दिला.
मार्च २०२० पासूनच्या लॉकडाऊनचा फटका उद्योगांबरोबर सर्वच क्षेत्रांना बसला. त्यामुळे पुन्हा त्या परिस्थितीला सामोरे जावे तर लागणार नाही ना, अशी भीती उद्योजकांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ व पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
रुग्णवाढीमुळे ८ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद केल्या आहेत. मंगल कार्यालये, खासगी कोचिंग क्लासेस, बाजारातील गर्दीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. निष्काळजीपण दिसला तर उद्योगांवरही निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांना शब्द दिला की, औरंगाबादेतील शेंद्रा, ऑरिक सिटी, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, वाळूज, पैठण रोड आदी ठिकाणच्या सर्व उद्योगांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचे तंतोतंत पालन केले जाईल, असे सायंकाळी पदाधिकाऱ्यांनी सर्व उद्योगांना लेखी सूचना दिल्या.
लसीकरणाबाबत सतर्कता
‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही औरंगाबादेतील सर्व उद्योजक कोरोनाच्या लसीकरणाबाबत सतर्क आहोत. उद्योगांतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, संचालकांना लस उपलब्ध करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. लॉकडाऊन काळात कोरोना तपासणीसाठी उद्योगांमध्येच सोय करण्यात आली होती. त्याच पद्धतीने मोठ्या उद्योगांमध्ये लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ. लसीकरणासाठी कॅम्प घेण्याची आमची तयारी आहे. त्याबाबत शासन निर्णयाची आम्ही वाट पाहात आहोत.
लस घेतलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू
आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस हवालदाराचा कोरोनासदृश आजाराने शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. भास्कर शंकर मेटे (५२, रा. मयूर पार्क) असे मृत हवालदाराचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, १३ फेब्रुवारी रोजी मेटे यांच्यासह बेगमपुरा पोलीस ठाण्यातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्यानंतर मेटे हे कामावर हजर झाले होते.
पंढरपूरसह दहा गावांत मंगळवारी संचारबंदी
पंढरपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर येथे माघी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. माघी एकादशीचा सोहळा २३ फेब्रुवारीला होणार आहे. अनेक वारकरी यात्रेपूर्वीच पंढरपुरात प्रवेश करून मठामध्ये मुक्काम करत आहेत. मठ मोकळे ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले.
अकोला : गत महिन्याच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील कोविडचा मृत्युदर ३ टक्क्यांहून घसरून २.८ टक्क्यांवर आला आहे. मात्र, मृत्युदराचा हा आकडा विदर्भात सर्वाधिक आहे. मृत्युदर कमी झाला असला, तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. विदर्भात अमरावतीचा रिकव्हरी रेट सर्वात कमी ८२.९ टक्के आहे, तर अकोला जिल्ह्याचा ८८.१ टक्के आहे.
जानेवारी महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. पण, गत आठवड्यापासून कोरोनाने अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात कहर केला. दररोज प्राप्त अहवालाच्या ५० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागल्याने चिंता वाढली. त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले.