CoronaVirus News: औरंगाबादेत रात्रीची संचारबंदी; रात्री ११ वाजेनंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर नोंदविणार गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:37 AM2021-02-24T01:37:31+5:302021-02-24T01:38:56+5:30
रात्री ११ वाजेनंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर नोंदविणार गुन्हे
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मंगळवारपासून ८ मार्चपर्यंत शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, औषधी दुकानदार, एसटी बस आणि एमआयडीसीमध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस गाड्यांना यातून वगळण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सांगितले की, शहरात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, परंतु नागरिक विनामास्क शहरात फिरताना दिसत आहेत. महापालिकेकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर रोज दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र प्रत्येक नागरिकावर कारवाई करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त पांडेय आणि आमची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत १४ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अधिसूचना काढण्यात येत आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आधी समजावून सांगून पाहू. यानंतरही जे नागरिक ऐकणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी दिला.
‘लॉकडाऊन’मध्येही नागरिक सुसाट
अमरावती/अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री ८ पासून अमरावती, अकोला महापालिका आणि अचलपूर, अकोट व मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु, मंगळवारी जीवनावश्यक वस्तू, औषधी खरेदीच्या नावे नागरिकांनी बाजारात तोबा गर्दी केली होती. जणू कोरोना नाहीच, अशा आविर्भावात नागरिक वावरताना दिसून आले. दुपारी तीन वाजेनंतर गर्दी ओसरण्यास सुरुवात झाली. मास्कचा वापर वाढलेला दिसला, हे विशेष. अमरावतीत सकाळपासूनच चौकाचाैकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सकाळी ८ ते दुपारी ३ अनेक जण अकारण फेरफटका मारत होते.
पारायण सप्ताहातून पसरला कोरोना
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : तालुक्यातील अवघ्या तीन हजार लोकवस्तीच्या ग्राम झाडेगाव येथे एकाच दिवशी तब्बल १५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच गावामध्ये आरोग्य पथक, पोलीस, महसूल यंत्रणा तैनात झाल्या असून आरोग्य विभागाने सर्वेक्षणाचे काम सुरू केले. हे गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या बघून निगेटिव्ह असलेल्यांनाच विलगीकरणात ठेवण्याची वेळ आली आहे. २२ फेब्रुवारीला ५० जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.२ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताह होता. आधी दोन महिला पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर गावात सर्दी आणि तापाची भयंकर साथ आली. २१३ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील १४१ जण पॉझिटिव्ह निघाले होते.