CoronaVirus News: ‘ते’ व्हेंटिलेटर्स नादुरुस्त; केंद्रीय पथकाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:52 AM2021-06-04T10:52:13+5:302021-06-04T10:52:32+5:30
औरंगाबादच्या निकृष्ट व्हेंटिलेंटर्सचा भंडाफोड
औरंगाबाद : केंद्र सरकारने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला (घाटी) पुरविलेल्या १५० निकृष्ट व्हेंटिलेटर्सची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दिल्लीतील दोन रुग्णालयांतील वरिष्ठ डाॅक्टर घाटीत दाखल झाले. तब्बल ५ तासांवर केलेल्या पाहणीत व्हेंटिलेटर्स नादुरुस्तच असल्याचे समोर आल्याची माहिती घाटीतील सूत्रांनी दिली. दरम्यान, आगामी दोन ते तीन दिवस घाटीसह ज्या रुग्णालयांत हे व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत, त्यांचीही पाहणी करून अहवाल दिला जाणार आहे.
केंद्र सरकारकडून घाटीला प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्सची नादुरुस्तीची अवस्था सर्वप्रथम ‘लोकमत’ने समोर आणत विविध वृत्तांमधून त्यासंदर्भात पाठपुरावा केला. घाटी रुग्णालयात गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दिल्लीतील सफदरजंग हाॅस्पिटलच्या भूलशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर डाॅ. अरीन चौधरी आणि आरएमएल हाॅस्पिटलच्या भूलशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर डाॅ. रूपेश यादव हे दाखल झाले. प्रारंभी, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुुरेश हरबडे, वैद्यकीय उपअधीक्षक डाॅ. विकास राठोड, डाॅ. संजय वाकुडकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर मेडिसिन विभागातील एका रिकाम्या वाॅर्डात रांगेत ठेवलेल्या व्हेंटिलेटर्सची त्यांनी पाहणी केली.
काही व्हेंटिलेटर्स शहरातील खासगी रुग्णालयांना आणि अन्य जिल्ह्यांना दिले आहेत. हे वरिष्ठ डाॅक्टर तेथेही भेट देऊन पाहणी करतील. त्याचा सविस्तर अहवाल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला तसेच न्यायालयात सादर करण्यात येईल.
ऑडिट झाले?
व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी एक पथक येऊन गेले, त्यांच्याकडूनही सविस्तर पाहणी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली; परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व्हेंटिलेटर्ससंदर्भात काहीही न बोलण्याची भूमिका घाटी प्रशासनाने घेतली आहे.