coronavirus : आता फक्त ‘हाय रिस्क’ संशयितांचीच होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:43 PM2020-05-20T17:43:36+5:302020-05-20T17:44:07+5:30
महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे.
औरंगाबाद : शहरात दररोज ५० ते ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. रुग्णसंख्या कशी कमी होईल यावर आता प्रशासकीय यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला की, त्या भागातील नागरिकांच्या लाळेचे नमुने मोठ्या प्रमाणात घेण्यात येत होते. आता यापुढे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ मंडळींचेच लाळेचे नमुने घेण्यात येणार आहेत.
महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. कालपर्यंत महापालिका ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला त्या भागातील ‘हाय रिस्क’ आणि ‘लो रिस्क’ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेत होती. ‘लो रिस्क’ गटातील सर्वच नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह येत असले तरी तपासणी यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. महापालिकेकडून दररोज ३०० ते ४०० लाळेचे नमुने जमा करण्यात येत होते. आता नवीन पद्धतीनुसार लाळेचे नमुने घेण्याचे प्रमाण आपोआपच कमी होणार आहे.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह आसपासच्या प्रमुख नागरिकांच्या लाळेचे नमुने घेतले जाणार आहेत. इतर संशयितांना घरातच विलगीकरण करून ठेवण्यात येईल. त्यांच्यामध्ये कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यास त्वरित लाळेचे नमुने घेण्यात येतील. विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांवर महापालिका वॉच ठेवणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
९००० लाळेचे नमुने घेतले
घाटी रुग्णालय आणि एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे दररोज पंधरा ते अठरा नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात येत आहेत. लाळेचे नमुने घेण्यासाठी महापालिकेने घाटी रुग्णालयाकडून काही डॉक्टर मागविले आहेत. या डॉक्टरांचे वेगवेगळे पथक तयार करून महापालिका दररोज ३०० ते ४०० नागरिकांच्या लाळेचे नमुने घेत आहे. आतापर्यंत शहरात ९ हजारापर्यंत लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत.
५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांकडे लक्ष
५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांकडे आता महापालिकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या लाळेचे नमुने न घेता किमान स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना थोडाफार त्रास आहे त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात येणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी नमूद केले.