coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ३ हजारांवर खाटा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:22 PM2020-10-15T19:22:55+5:302020-10-15T19:24:27+5:30
coronavirus news खाटा अपुऱ्या पडत असल्याने तेव्हा युद्धपातळीवर खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.
औरंगाबाद : सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या उपचारासाठी खाटांची शोधाशोध करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर ओढावत होती; परंतु गेल्या १७ दिवसांत परिस्थिती बदलली असून, ३ हजारांवर खाटा सध्या रिक्त आहेत.
जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल ६ हजार १३५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होते. खाटा अपुऱ्या पडत असल्याने तेव्हा युद्धपातळीवर खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, २५ सप्टेंबरनंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. जिल्ह्यात सोमवारपर्यंत दाखल रुग्णांची संख्या निम्म्यावर आली. गेल्या १७ दिवसांत रुग्णांची संख्या घटल्याने तब्बल ३ हजार ३५९ खाटा रिक्त झाल्या आहेत.
घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे येथेही २३९ खाटा रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटा अपुऱ्या पडत असल्याने १०० खाटा वाढविण्यात आल्या; परंतु सध्या केवळ १२४ रुग्ण दाखल असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी दिली. खाजगी रुग्णालयांमध्येही सध्या मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त आहेत.
केवळ १०८ गंभीर रुग्ण
घाटीत २४ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड ब्रेक ३५३ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते. यात गंभीर रुग्णांची संख्याही तब्बल २३० होती; परंतु मंगळवारी दाखल रुग्णांची संख्या १७९ इतकी होती. यात १०८ रुग्ण हे गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांबरोबर गंभीर अवस्थेतील रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे.