CoronaVirus : सिल्लोड नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम; शहरात 20 हजार मास्क, 10 हजार साबणांचे केले वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:44 PM2020-04-01T19:44:00+5:302020-04-01T19:44:23+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचा उपक्रम
सिल्लोड : सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी बुधवारी शहरातील गरजू नागरिकांना 20 हजार मास्क तसेच 10 हजार साबण वाटण्याचा स्तुत्य उपक्रम सिल्लोड नगरपरिषदेने राबविला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मास्क , साबण वाटप , स्वच्छता व निर्जंतुकीकरणा साठी विविध उपक्रम राबविणारी सिल्लोड नगर परिषद पहिली ठरली आहे.
कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शहरातील विविध ठिकाणी तसेच वाडी वस्त्यांमध्ये जाऊन लॉकडाऊन अंमलबजावणीबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना मास्क व साबणाचे त्यांनी वाटप केले. या प्रसंगी नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर , उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे ,पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे आदींची उपस्थिती होती.
शहरात विविध ठिकाणी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना विविध ठिकाणी हात धुण्यासाठी नगर परिषदेने व्यवस्था केली आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे शासन सर्वतोपरी दक्षता घेत असून कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये शासनाच्यावतीने देण्यात येणारे धान्य येत्या 4 तारखेपर्यंत नागरिकांना मिळेल असे यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.