coronavirus : औरंगाबादमध्ये एकाच दिवसात विक्रमी १० हजार टेस्ट; ८५ व्यापारी आढळले कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 01:31 PM2020-07-19T13:31:11+5:302020-07-19T13:39:56+5:30
औरंगपुरा येथे सर्वाधिक २५ विक्रेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
औरंगाबाद : शहरात शनिवारी दिवसभरात विक्रमी ९ हजार ९०३ नागरिकांच्या कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी २५२ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये ८५ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. औरंगपुरा येथील केंद्रावर सर्वाधिक २५ विक्रेते कोरोनाबाधित आढळले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लॉकडाऊनच्या शेवटच्या दििवशी झालेली ही मेगा टेस्ट मोहीम महापालिकेच्या विविध केंद्रावर शनिवारी रात्री उशिरापर्यंत राबविण्यात आली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शहरात १० जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केले होते. शनिवारी लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी महापालिकेने विविध केंद्रावर अँटिजेन पद्धतीच्या कोरोना टेस्टची मेगा मोहीम राबविली. शहरातील भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, अंडी, दूध या विक्रेत्यांना रविवारपासून दुकाने उघडण्यासाठी कोरोना तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या तपासण्यासाठी शहरात २२ ठिकाणी शिबिर घेण्यात आले, त्यात दिवसभरात ४२७४ विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात ८५ व्यापारी कोरोनाबाधित आढळून आल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला. त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
या ठिकाणी होत आहेत अँटीजन टेस्ट :
व्यापाऱ्यांच्या तपासणी शिबिरात औरंगपुरा येथे २५, रामनगर येथे १४ आणि संभाजी कॉलनी येथे १४ व्यापारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच महापालिकेने शहराच्या सीमेवर ६ चेक पॉईंट आणि इतर काही वसाहतींमध्ये सामान्य नागरिकांसाठीही तपासणी मोहीम राबविली. त्यात ५ हजार ६२९ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १६७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.