CoronaVirus : दिलासादायक ! कोरोना संशयित आणि संपर्कातील तब्बल २९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 04:33 PM2020-05-01T16:33:01+5:302020-05-01T16:33:59+5:30
शहरात तब्बल 177 रुग्ण आहेत
औरंगाबाद : शहरात सकाळपासून कोरोना संशयित आणि संपर्कातील तब्बल 292 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसात शहरात मोठ्याप्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत रुग्णसंख्या 177 वर गेली आहे. यात शुक्रवारी दुपारपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने शहारवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी सकाळपासून 216 नमुण्याची तपासणी झाली. त्यात महापालिकेच्या 185 तर जिल्हा रुग्णालयातील 31नमुन्यांचा समावेश होता हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी सांगितले. यानंतर आणखी 76 स्वब निगेटिव्ह आले. त्यात जिल्हा रुग्णालयातील 55, महापालिकेकडून आलेले 19 आणि घाटी रुग्णालयातील दोघांच्या नमुन्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गुरुदत्त नगर येथील 47 वर्षीय वाहन चालकाचा कोरोनामुळे शुक्रवारी सकाळी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे मृत्यूचा आकडा आठ वर पोहचला आहे.
एकूण रुग्णसंख्या 177,नवीन ठिकाणांची भर
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच जात असून नवीन हॉटस्पॉटसुद्धा पुढे येत आहेत. प्रशासनाने तात्काळ हालचाली करत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 47 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे रुग्णांची संख्या 177 वर गेली असून नव्या ठिकाणांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.