CoronaVirus : करमाडकरांना दिलासा ! कोरोंग्रस्ताच्या संपर्कातील चार महिलांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 12:09 PM2020-05-02T12:09:13+5:302020-05-02T12:10:56+5:30
करमाडसह परिसरातील जवळपास 20 गावांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
करमाड : क्वारंटाईन कक्षातील कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या करमाड येथील 4 महिलांचा दोन दिवसांपूर्वी स्वॅब घेण्यात आला होता. तो निगेटिव्ह आल्याने करमाडसह परिसरातील जवळपास 20 गावांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
चिकलठाणा येथील क्वारंटाईन कक्षातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. यामुळे तेथे काम करत असलेल्या करमाड येथील 4 महिलांची चाचणी घेण्यात आली. करमाड येथील महिलांचा संपर्क कोरोनाग्रस्ता सोबत आल्याचे समजताच पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली होती.
क्वारंटाईन कक्षातील नागरिकांसाठी स्वयंपाक करण्यासाठी करमाड येथील 4 महिला चिकलठाणा येथे जात होत्या. त्यांचा संपर्क कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी आला असावा असा संशय आल्याने या महिलांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. शनिवारी त्यांच्या स्वॅब चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. औरंगाबाद जालना महामार्गावरील व औरंगाबाद तालुक्यातील करमाड हे महत्त्वाचे सेंटर असून जवळपास 25 ते 30 गावचे हे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या महिलांच्या रिपोर्टकडे करमाडसह संपूर्ण औरंगाबाद तालुक्याचे लक्ष लागून होते.