coronavirus : दिलासादायक; कोरोनाग्रस्त प्राध्यापिकेच्या संपर्कातील महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 03:02 PM2020-03-18T15:02:35+5:302020-03-18T15:04:53+5:30
अहवाल निगेटिव्ह येणे शहरासाठी दिलासादायक
औरंगाबाद : शहरातील कोरोनाग्रस्त एकमेव रुग्ण प्राध्यापिकेच्या सर्वाधिक संपर्कातील ३६ वर्षीय महिलेचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह येणे औरंगाबाद शहरासाठी दिलासादायक आहे.
रशिया येथून परतलेली प्राध्यापिकेस कोरोनाची लागण झाल्याचे कळताच शहरात खळबळ उडाली होती. यानंतर प्राध्यापिका शिकवत असलेली शैक्षणिक संस्था आणि निवासी परिसर येथे आरोग्य पथकाने युद्ध पातळीवर सर्वेक्षण केले. यात प्राध्यापिकेच्या संपर्कात आल्याचे संशयावरून हजारो नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्या सर्वाधिक जवळच्या नागरिकांचीही यावेळी तपासणी करण्यात आली.
दरम्यान, प्राध्यापिकेच्या सर्वाधिक जवळच्या संपर्कात असलेली एक महिला कोरोना संशयित असल्याचे रविवारी पुढे आले. या महिलेची स्वाब चाचणी करण्यात आली. याचा अहवाला बुधवारी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे. यामुळे शहर अजून कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले