CoronaVirus : पैठणकरांना दिलासा ! कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 06:53 PM2020-04-08T18:53:59+5:302020-04-08T18:55:48+5:30
घाटी रुग्णालयातील ब्रदर कोरोना पॉझिटिव्ह असून त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री पैठणची आहे
पैठण : शहरातील शशीविहार परिसरातील सहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. नेमका अहवाल काय येतो या शंकेने पैठणकरांची धाकधूक वाढली होती. परंतु, अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पैठण करांचा जीव भांड्यात पडला आहे.
घाटी रूग्णालय औरंगाबाद येथील कोरोनाची लागण झालेला ब्रदर पैठण येथील शशी विहार परिसरातील नातेवाईकांकडे येऊन गेल्याची माहीती समोर आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या वसाहतीतील सहा नागरिकांचे कोरोना टेस्टसाठी रविवारी स्वँब घेतले होते. दोन दिवसा पासून त्यांचा अहवाल
काय येईल या शंकेने पैठण शहराची धाकधूक मात्र वाढली होती. आज दुपारी तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी त्या सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची पुष्टी केली. यानंतर सर्व शहरातील काळजीचे सावट दूर झाले.
कोरोना बाधित ब्रदर शशीविहार परिसरातील नातेवाईकांकडे येऊन गेल्या नंतर सोमवारी या भागातील जवळपास २०० नागरिकांना होम क्वारंटाईन करून परिसर सील करण्यात आला होता.
आज शासकीय रूग्णालयातील डॉ संदिप रगडे, तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, आरोग्य पथकातील कर्मचारी, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, स्वच्छता सभापती भूषण कावसानकर आदीच्या पथकाने शशीविहार भागात जाऊन नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू दूध, भाजीपाला आदी उपलब्ध करून दिले. तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, डॉ संदिप रगडे यांनी आज परत एकदा या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत सर्व रहिवाशी ठणठणीत आढळून आले.
दरम्यान, या परिसरातील नागरिक निगेटिव्ह आले असले तरी शशी विहार वसाहतीतील कोरंटाईन केलेल्या नागरिकांनी पुढील १३ दिवस घराबाहेर पडू नये अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.