coronavirus : सुटकेचा निश्वास; कोविड सेंटरमधून पळालेल्या पॉझिटिव्ह कैद्याला पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:02 PM2020-06-10T16:02:32+5:302020-06-10T16:04:51+5:30
बुधवारी दुपारी दिल्लीगेट परिसरात पोलिसांनी घेतले ताब्यात
औरंगाबाद : महापालिकेच्या कोविड सेंटरमधून उपचारादरम्यान पळालेल्या हर्सूल जेलमधील दोनपैकी एका कैद्याला दिल्लीगेट परिसरात बुधवारी दुपारी सिटीचौक पोलिसांनी पकडले. सय्यद सैफ सय्यद असद (रा. नेहरूनगर), असे अटकेतील कैद्याचे नाव आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, ७ जून रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास किलेअर्क येथील कोविड कें द्रातून उपचारादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह कैदी अक्रम खान अय्याज खान आणि सय्यद सैफ सय्यद असद यांनी धूम ठोकली होती. या घटनेप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलीस त्यांचा शोध घेत होते.
बुधवारी दुपारी कैदी सैफ हा दिल्लीगेट परिसरात पायी जात असल्याचे गस्तीवरील सिटीचौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे हवालदार मोरे यांना दिसले. मोरे हे सैफला ओळखत होते. यामुळे त्यांनी त्या आरोपीला जवळच्या बंद टपरीजवळ खुर्चीवर बसायला सांगितले. सैफनेही कोणताही प्रतिकार न करता खुर्चीवर बसला. यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस कर्मचारी अभिजित देशमुख आणि माजेद हे तेथे दाखल झाले. या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाला कळविण्यात आली. रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे सैफ रुग्णवाहिकेत जाऊन बसला. यानंतर त्याची रवानगी हर्सूल जेलमध्ये करण्यात आली.