CoronaVirus : दिलासादायक ! कोरोनाबाधित जवानाच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:25 PM2020-05-03T12:25:27+5:302020-05-03T12:27:12+5:30
हिरापूर-वरुड काजी ग्रामस्थांना दिलासा
करमाड : SRPF चा कोरोना पॉजेटिव्ह जवान आठवडाभर हिरापूर येथे राहिल्याचे समजताच त्याच्या संपर्कात आलेल्या (कुटुंबातील) ६ जणांची शनिवारी कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी ३ मे रोजी निगेटिव्ह आल्याने हिरापूर - वरुड काजी येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या सर्व संशयितांना होम कॉरंटाईन करण्यात आले असून १४ दिवसानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पो.नी.महेश अंधळे यांनी दिली.
जालना येथे कार्यरत असलेला हिरापूर ता.औरंगाबाद येथील SRPF चा जवान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्त कामी गेलेला होता. हा जवान २० एप्रिल रोजी आपल्या पत्नी व २ मुलांसह दुचाकीवर हिरापूर येथे आई वडिलांना भेटण्यासाठी आला होता. सात दिवस हिरापूर येथे राहिल्यानंतर २६ तारखेला तो जवान पत्नी व मुलांना घेऊन जालना येथे कर्तव्यावर हजर झाला असता त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली व त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी तात्काळ गाव सील केले. या जवानाच्या परिवारातील ६ जणांना तपासणी साठी पाठवण्यात आले होते. ३ मे रोजी त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हिरापूर-वरुडसह औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १५ गावांनी सुटकेचा निश्वास सोडला.