coronavirus : सोयगावकरांना दिलासा ! सुरतमधील पॉझिटिव्ह घरमालकाच्या संपर्कातील चार मजुर निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 02:16 PM2020-05-11T14:16:42+5:302020-05-11T14:17:35+5:30
सध्या तालुक्यात एकही कोरोना संशयित नाही.
सोयगाव : गुजरात(सुरत) येथून आलेल्या चार मजुरांचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्याने आमखेडा भागासह सोयगाव तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोयगावमध्ये परतल्यानंतर या चारही मजुरांचा घरमालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली असता ते निगेटिव्ह आढळून आले. सध्या तालुक्यात एकही कोरोना संशयित नाही.
सुरत(गुजरात)येथून पाच दिवसापूर्वी आलेल्या आमखेडा(सोयगाव)येथील ३२ मजुरांना ग्रामीण रुग्णालयाने कोविड-१९ ची तपासणी करून होमकोरोटाईन केले होते. परंतु त्यानंतर यातील चार मजुरांचा सुरत येथील घरमालक पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. सकारात्मक आल्याचा एक दूरध्वनी आल्याने सोयगावात खळबळ उडाली होती. यानंतर सरपंच अनिता महाले यांनी त्या चारही मजुरांना पुन्हा तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे, वैद्यकीय अधिकारी डॉ.शिल्पा देशमुख, डॉ.चेतन काळे, डॉ.अभिजित सपकाळ यांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. सोमवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे आमखेडासह सोयगाव तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, सुरतचा घरमालक सकारात्मक आल्याचा फोन येताच या चौघांनी आम्ही त्यांच्या संपर्कात आलो होतो, आमची तपासणी करा असा आग्रह धरला होता.
ते चारही मजूर कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाने दिला आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात आता कोविड-१९ चा एकही संशयित रुग्ण नाही.
- डॉ.श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी