coronavirus: कोरोनाचा निवासी, इंटर्न अन् भावी डाॅक्टरांनी घेतला धसका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:59 AM2021-03-29T07:59:18+5:302021-03-29T07:59:50+5:30

coronavirus: साडेचार वर्षे एमबीबीबीएस, इंटर्नशिप त्यानंतर एमडी, एमएस करण्याचे स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डाॅक्टर, भावी डाॅक्टरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत टाकले आहे.

coronavirus: Resident, intern and future doctors took the shock of coronavirus | coronavirus: कोरोनाचा निवासी, इंटर्न अन् भावी डाॅक्टरांनी घेतला धसका

coronavirus: कोरोनाचा निवासी, इंटर्न अन् भावी डाॅक्टरांनी घेतला धसका

googlenewsNext

- योगेश पायघन
 
औरंगाबाद : दहावी, बारावीत रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास केला. चांगला स्कोअर केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आता इथे साडेचार वर्षे एमबीबीबीएस, इंटर्नशिप त्यानंतर एमडी, एमएस करण्याचे स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डाॅक्टर, भावी डाॅक्टरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत टाकले आहे. कोविड, नाॅनकोविडच्या फेऱ्यात पोस्टिंग, थेअरी, परीक्षेकडे होणारे दुर्लक्ष वैयक्तिक नुकसान असल्याची भावना असून, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांची मागणी ते करत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) विभागीय टर्शरी सेंटर आहे. शेजारील दहा ते बारा जिल्ह्यांतील दुर्धर आजाराचे रुग्ण उपचारांसाठी येतात. तसेच लाखोंना जीवदान दिलेल्या घाटीचा लाैकिक असल्याने विद्यार्थी इथे शिकण्यासाठी प्राधान्यक्रम देतात. 

कोरोनामुळे ११७७ खाटांच्या घाटी रुग्णालयातील सुमारे साडेसहाशे खाटा आता कोरोना रुग्णांसाठी राखीव असून, केवळ मेडिसीन विभागच नाही तर सर्वच २२ विभागांचे निवासी डाॅक्टर, वैद्यकीय शिक्षक कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. गेल्या वर्षभरात ६०८८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. 

यात निवासी डाॅक्टर आणि इंटर्नचे वर्ष गेले तर एमबीबीएस विद्यार्थ्यांच्याही शिक्षणावर परिणाम झाला. आता दुसऱ्या लाटेने रुग्णांपेक्षा डाॅक्टरांना वैद्यकीय शिक्षणाच्या चिंतेत टाकले असून, कामाच्या तणावात असल्याची परिस्थिती घाटीतील विद्यार्थ्यांनी लोकमतकडे व्यक्त केली. 

इंटर्नशिपमध्ये प्रत्येक विभागात दीड महिन्याची पोस्टिंग असते. प्रात्यक्षिक शिकायला मिळतात. मात्र, कोरोनामुळे मला ६ महिन्यांत सात पोस्टिंग मिळाल्या. त्यापैकी चार विभागांत थोडेफार शिकता आले. हे माझे वैयक्तिक शैक्षणिक नुकसान आहे. ७० इंटर्न्स पूर्वी जे काम करायचे ते आज ३० इंटर्न्सला करावे लागत आहे. ११ हजार स्टायपेंड व्यतिरिक्त १९ हजार कोविड भत्ता मिळावा, अशी मागणी आहे.
-डाॅ. किरण अल्हाट, अध्यक्ष, 
असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी), घाटी  

पूर्ण एकवर्षाचे शैक्षणिक नुकसान कोरोनाच्या पहिल्या लाटेत झाले. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करा हे वारंवार मागणी मार्ड करतेय. २५ मे पासून अंतिम वर्षाच्या परीक्षा आहेत. गेल्यावर्षी मी काही शिकलो नाही तर जुनीयरला काय शिकवणार ? पूर्ण साखळी बिघडत आहे. हे थांबवणे शक्य आहे. ते कंत्राटी वैद्यकीय अधिकारी भरुन थांबवले पाहीजे. 
-डाॅ. आबासाहेब तिडके, अध्यक्ष, मार्ड, घाटी, औरंगाबाद  

नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना हव्यात 
दोन वर्षांपासून रुग्णांशी संबंधी येईल म्हणून मायनरची वाट पाहत होतो. आता तिसरे वर्ष म्हणजे मायनर इयरला शिकताना कोरोनामुळे प्रात्यक्षिक बंद झाले. रुग्णांशी संबंध यायचा तो आता येत नाही. केवळ थेअरीवर शिक्षण सुरू आहे. शिकाऊ डाॅक्टर आणि रुग्णातील होणारा संवाद बंद झाल्याने शिकणार काय, असा प्रश्न निर्माण झालाय. शैक्षणिक नुकसान होतंय ते टाळण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहीजे.
-अभिषेक थोरात, 
एमबीबीएस, विद्यार्थी
 
शेवटच्या म्हणजे मेजर इयरला प्रत्येक विभागात पोस्टिंग मिळतात. त्यातून त्या विभागातील रुग्णांशी संपर्क येतो. काही ऑनलाइन क्लासेस होतात. 
मात्र, ते तेवढे प्रभावी ठरत नाही. कोरोनामुळे रुग्णच बघायला मिळत नाही. प्रत्येक विभागात एक महिना प्रात्यक्षिक असते. तसे न होता. 
केवळ थेअरीच्या शिक्षणावर परीक्षा झाली. यात शैक्षणिक नुकसान 
आहे.
- उत्कर्ष देशमुख, 
एमबीबीएस, विद्यार्थी 

एमडीचे पहिले वर्ष कोरोनात गेले. आता दुसऱ्या लाटेत दुसरे वर्षही जाण्याची चिंता सतावत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाला वैद्यकीय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ भरण्याची मागणी करत आहोत. त्याकडे दुर्लक्ष करून आता पुन्हा साडेसहाशेहून साडेआठशे बेड केले जात आहे. दुसरे आणि तिसरे वर्ष एमडी, एमएसमध्ये खूप महत्त्वाचे असते. कामाचा व्याप वाढत असताना काय शिकणार याची चिंता सतावतेय.
    -डाॅ. भाग्यश्री वाघमारे, निवासी डाॅक्टर, घाटी

Web Title: coronavirus: Resident, intern and future doctors took the shock of coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.