coronavirus : औरंगाबादेत २६ हजारांहून अधिक नागरिकांच्या लाळेचे नमुने; ६ कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 08:02 PM2020-07-09T20:02:04+5:302020-07-09T20:02:25+5:30
महापालिकेने मागील काही दिवसांपासून कोरोना टेस्टवर सर्वाधिक भर दिला आहे.
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंत २६ हजारांहून अधिक नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. एका नमुन्याच्या तपासणीसाठी तब्बल २,२०० रुपये खर्च येत आहे. आतापर्यंत ५ कोटी ७७ लाख ८ हजार रुपये खर्च आला आहे.
महापालिकेने मागील काही दिवसांपासून कोरोना टेस्टवर सर्वाधिक भर दिला आहे. मंगळवारी तब्बल एक हजार नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील १६६ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्येही औरंगाबाद शहरातील नागरिकांची संख्या ९९ एवढी होती. ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत, त्या परिसरात किमान पाचशे मीटरपर्यंत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या लाळेचे नमुने घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. असंख्य नागरिक लाळेचे नमुने देण्याचे टाळत आहेत. घराला कुलूप लावून अनेक जण पळून जात होते. १० जुलैपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीत नागरिकांना पळून जाता येणार नाही. त्यामुळे महापालिकेने ५० हजार नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
घाटी रुग्णालयात सर्वात कमी लाळेचे नमुने घेण्यात येतात. महापालिका दररोज ८०० ते १,००० पर्यंत लाळेचे नमुने घेत आहे. महापालिकेला आता एका व्यक्तीच्या लाळेचे नमुने घेण्यासाठी फक्त २०० रुपये कीटचा खर्च येत आहे. घाटी रुग्णालयाला तपासणीसाठी २ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली.
आता दोन प्रकारची तपासणी
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कालपर्यंत महापालिका नाकातून आणि घशातून लाळेचे नमुने घेत होती. या नमुन्यांची तपासणी घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. या तपासणीचा खर्च महापालिकेला पूर्वी २०० रुपये येत होता. आता हा खर्च १०० रुपयांवर आला आहे. लॉकडाऊनमध्ये महापालिकेला लाळेचे नमुने घेणारे कीट २०० रुपयांमध्ये भेटत होते. कोरोना टेस्टची दुसरी नवीन पद्धत अँटिजन टेस्ट बुधवारपासून सुरू करण्यात आली. या प्रकारामध्ये रुग्णाच्या लाळेचे नमुने घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात अहवाल प्राप्त होतो. यामध्ये एका टेस्टचा खर्च फक्त ५०० रुपये आहे. ५० हजार टेस्टचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.