CoronaVirus : हिरकणीची ढाल ! कोरोनाला हरविण्यासाठी चिमुकलीसोबत उभी राहिली आई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 01:52 PM2020-04-07T13:52:48+5:302020-04-07T15:43:49+5:30
पॉझिटिव्ह मुलीसोबत आईही आयसोलेशन कक्षात
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जगात येण्यापूर्वी म्हणजे जन्मापूर्वी गर्भातील कोवळा जीव जीवापाड जपणारी आईच असते. तेच मूल जर भविष्यात मृत्यूच्या दारात असेल तर आपला जीव धोक्यात घालणारीही आईच असते. याची प्रचिती म्हणजे, अवघ्या ७ वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलीसोबत एक माता थेट रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात थांबली आहे. मुलीसाठी ही जन्मदात्री आजाराच्या विरोधात उभी राहिली आहे.
शहरात २ एप्रिल रोजी एन-४ येथील महिला कोरोनाबाधित आढळून आली. तिच्या पतीसह अन्य नातेवाईक कोरोना निगेटिव्ह आढळले. मात्र महिलेची सात वर्षीय नातीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि एकच खळबळ उडाली. शहरात पहिल्यांदाच एका लहान मुलीला कोरोनाची बाधा झाली. या मुलीवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत एखादा व्यक्ती शिंकला, खोकलला तर इतर लोक चार हात दूर पळतात. मात्र, चिमुकलीवर ओढवलेल्या परिस्थितीत तिची आई तिच्यासोबत उभी आहे. यासाठी तिच्या उपचारासाठी आईही रुग्णालयात दाखल झाली आहे. नातेवाईकांसह या चिमुकलीच्या आईचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. मुलीसोबत थांबल्याने आता चार दिवसांनंतर त्यांचा अहवाल पुन्हा एकदा घेतला जाणार आहे. या चिमुकलीची प्रकृती स्थिर असून औषधोपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कठीणप्रसंगी आई आपल्या मुलांसाठी स्वतःचा जीव ही धोक्यात घालते याच जिवंत उदाहरण औरंगाबादेत बघायला मिळाले. संकटात मुलीला हिंमत मुलीवर आलेल्या संकटाने खचून न जाता मुलीसोबत थांबून कोरोनाला हरविण्याचा एकप्रकारे निर्धार या आईने केला आहे. मुलीला आपल्या भावनेतून हिंमत देत आहे, तुला काही होणार नाही, होऊ देणार नाही, मी तुझ्यासोबत आहे, असा धीर देत आहे. आपल्याला काय झाले आहे, याची या चिमुकलीला कल्पनाही नाही. आई सोबत आहे, फक्त एवढेच माहित आहे. उदभवलेल्या संकटाला सामोरे जाताना जीवाचा धोका मुलीसमोर या आईला गौण वाटत आहे. पीपीई किटचा आधार मुलीसोबत थांबलेल्या या आईला पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किट देण्यात आला आहे. तर मुलीला उपचाराच्या दृष्टीने आवश्यक बाबींश रुग्णालयातील गणवेश देण्यात आलेला आहे. मुलीच्या प्रकृतीकडे डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.