CoronaVirus : धक्कादायक ! कोरोनामुक्त झालेले ७९ वर्षीय ज्येष्ठ पुन्हा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 09:28 PM2020-04-28T21:28:06+5:302020-04-28T21:29:52+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल
औरंगाबाद : जलाल कॉलनी येथील कोरोनावर विजय मिळविणाऱ्या ७९ वार्षीय ज्येष्ठाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. परंतु शहरातील जलाल कॉलनीतील ७९ वर्षीय ज्येष्ठाने कोरोनावर विजय मिळविला होता. जिल्हा रुग्णालयातील १५ दिवसांच्या उपचारानंतर या ज्येष्ठ नागरिकासह कोरोनावर विजय मिळविणाऱ्या ७ रुग्णांना २० एप्रिल रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शहरात आतापर्यंत २४ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाले. जलाल कॉलनीतील ७९ वर्षीय रुग्ण शहरात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांत सर्वात ज्येष्ठ ठरले होते.हे ज्येष्ठ नागरिकानी खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात २५ वर्षांपूर्वी सहायक अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. रुग्णालयातून गेल्यानंतर अवघ्या ८ दिवसांतच त्यांच्यात पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांचा स्वब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा उपचार करण्यात येत आहे, असे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
शहरात प्रथमच असे घडले
अन्य काही शहरात कोरोनामुक्त झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह झाल्याचे यापूर्वी समोर आले होते. परंतु शहरात पहिल्यांदा असा प्रकार समोर आला. अन्य कोरोनामुक्त रुग्णांकडेही लक्ष शहरात कोरोनामुक्त झालेल्या अन्य रुग्णांकडे लक्ष दिले जात आहे. त्यांना १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे, असे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.