coronavirus : धक्कादायक ! आईने सुटी मिळाल्याचा फोन केला; मुलगा नेण्यासाठी आला तर रुग्णालयाने मृतदेह हाती दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 07:10 PM2020-07-17T19:10:15+5:302020-07-17T19:26:02+5:30
आईचा सुटी झाल्याचा निरोप भेटला म्हणून मुलगा रुग्णालयात आला
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात १० दिवस कोरोनावर उपचार घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास महिलेने मुलाला फोन करून सुटी झाल्याचे सांगितले. मुलगा आईला आणण्यासाठी रुग्णालयात गेला; परंतु डॉक्टरांनी थेट आईचा मृत्यू झाल्याची माहिती मुलाला दिल्याची धक्कादायक घटना घडली.
बायजीपुऱ्यातील कुटुंबाला या दुर्धर प्रसंगाला सामोरे जावे लागले. मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, ७ जुलै रोजी घरातील ५४ वर्षीय ही महिला पॉझिटिव्ह आली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी त्यांना डिस्चार्ज होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला फोन करून घ्यायला बोलावले. दुपारी ४ वाजता मुलगा त्यांना घेण्यासाठी गेला. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला आईची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगितले. काही वेळाने कागदपत्रांवर सह्या घेऊन आईचा मृतदेहच दिला. ४ जुलै रोजी रात्री वडिलांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी त्यांचा तेरावा होता. तेराव्याचा कार्यक्रम आटोपून मुलगा आईला न्यायला गेला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
स्वागताची तयारी, अंत्यविधीत बदलली
१० दिवस उपचारानंतर मावशी घरी येणार होत्या. त्यांचे स्वागत करायचे आम्ही ठरवले होते. स्वागतासाठी आणलेली फुले त्यांच्या पार्थिवावर वाहावी लागतील, असे वाटले नव्हते. असा अचानक मृत्यू कसा होऊ शकतो, असा प्रश्न या महिलेचे नातेवाईक प्रसाद धोपटे यांनी उपस्थित केला. रुग्णांना सुटी ही सकाळी दिली जाते. रुग्णांना रुग्णवाहिकेतून घरी सोडले जाते. सदर महिलेला १७ जुलैला सुटी होणार होती. हृदयविकारामुळे महिलेचा मृत्यू झाला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.