CoronaVirus : धक्कादायक ! शहरात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:56 PM2020-05-04T17:56:46+5:302020-05-04T17:57:48+5:30
औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा कालावधी २० एप्रिल रोजी ७ दिवस, असा मोजला जात होता. त्यानंतरही शहरात दररोज एक, दोन नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला होता.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाचे रुग्ण दुप्पट (डबलिंग रेट) होण्याचा वेग वाढला असून, हा वेग गेल्या पाच दिवसांत ९ दिवसांवरून ६ दिवसांवर आला आहे.
औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा कालावधी २० एप्रिल रोजी ७ दिवस, असा मोजला जात होता. त्यानंतरही शहरात दररोज एक, दोन नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला होता. २७ एप्रिल रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ९.२ दिवसांवर आला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु याच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होण्यास सुरुवात झाली. या दिवशी २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. हा औरंगाबादकरांसाठी मोठा धक्का होता. यानंतरच्या पुढील प्रत्येक दिवशी शहरात २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. ३० एप्रिल रोजी सर्वाधिक ४७ रुग्णांचे निदान झाले. परिणामी रुग्ण दुप्पट होण्याची गतीही वाढली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी म्हणाले, सध्या रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६.३ दिवसांवर आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार सुरू आहे. नवीन रूग्ण आढळून आले तरी त्यांच्या उपचाराची सुविधा शहरात करण्यात आलेली आहे.
असे काढले जाते रुग्ण दुपट होण्याचा वेग
शहरात १५ मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर दुसरा रुग्ण थेट २ एप्रिल रोजी दोन रुग्ण आढळून आले होते. यानुसार एका रुग्णाचे दोन, दोनाचे चार, चार रुग्णांचे आठ रुग्ण कधी झाले, यानुसार रुग्ण दुप्पट होण्याचा वेग किती दिवसांवर आहे, हे काढले जात असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सांगितले.
रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २० एप्रिल - ७.२ दिवस २७ एप्रिल - ९.२ दिवस २८ एप्रिल - ६.८ दिवस २ मे - ६.३ दिवस असे वाढले गेल्या १४ दिवसांत रुग्ण दिनांक रुग्णसंख्या १९ एप्रिल २ २० एप्रिल १ २१ एप्रिल ४ २२ एप्रिल २ २३ एप्रिल २ २४ एप्रिल ४ २५ एप्रिल ५ २६ एप्रिल ४ २७ एप्रिल २९ २८ एप्रिल २७ २९ एप्रिल २१ ३० एप्रिल ४७ १ मे ३९