coronavirus : धक्कादायक ! कोरोना योद्ध्यांना वसतिगृहाबाहेर काढण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:56 PM2020-08-03T19:56:04+5:302020-08-03T19:59:46+5:30
शुल्क वसुलीचे प्रकरण न्यायालयात असताना प्रकार
औरंगाबाद : कुटुंबाच्या सुरक्षेसाठी जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉक्टर व परिचारिकांची सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात निवासाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी शुल्क मागणीच्या प्रकारानंतर आता कोरोना योद्ध्यांना थेट केंद्राबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी नोटीस देण्यात आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी या कोरोना योद्ध्यांच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात करण्यात आलेल्या निवासापोटी २ लाख रुपये बिल देण्यात आले होते. हा प्रकार ‘लोकमत’ने २१ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो दाखल करून घेतली आहे. त्यांच्याकडून निवास शुल्क कसे आकारता येईल, असे निरीक्षण नोंदवीत कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोरोना योद्ध्यांचा समूह तयार करावा लागेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. हे प्रकरण न्यायालयात आहे. याविषयी केंद्राचे प्राचार्य डॉ. सुधाकर शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
वसतिगृह सोडणार नाही
वसतिगृह रिकामे करण्यासंदर्भात ३ दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली आहे; परंतु कोणीही वसतिगृह सोडणार नाही. शिवाय प्रकरण न्यायालयात आहे.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक