लय भारी! होमक्वारंटाईन व्यक्ती घराबाहेर असल्याचे दाखवा; ५०० रुपये मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 07:43 PM2020-05-04T19:43:46+5:302020-05-04T20:19:05+5:30
तसेच क्वारंटाईन असलेला मजूर घराबाहेर पडलेल्यास ५०० रु दंड.
सोयगाव : शासनाने परजिल्ह्यात आणि परराज्यात अडकलेल्या मजुरांना परवानगी घेवून स्थानिक ठिकाणी येण्यास परवानगी दिल्याने सोयगाव तालुक्यात मजुरांचा वाढता प्रभाव आढळून आला आहे.त्यामुळे जरंडी ता.सोयगाव गावात आलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना आरोग्य विभागाने तपासणी करून १४ दिवस होमक्वारंटाईन केल्यानंतर घराबाहेर आढळल्यास पाचशे रु दंड आणि अशा मजुरांचे घराबाहेर असल्याचे छायाचित्र पुरविल्यास त्यास पाचशे रु बक्षीस असा ठरावच जरंडीच्या ग्रामपंचायतीने केला आहे.
जरंडी ता.सोयगाव येथे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई,औरंगाबाद,आणि पुणे येथून मजुरांचा वाढता प्रभाव आहे. मजुरांचा या ठिकाणावरून ओघ वाढला असल्याने आरोग्य विभागाच्या तपासणीनंतर पुन्हा १४ दिवस होमक्वारंटाईन झालेला मजूर घराबाहेर आढळल्यास त्यास पाचशे रु दंड देण्याबाबत लेखी सूचनाच संबंधित मजुराच्या कुटुंब प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यावर परजिल्ह्यातून आलेल्या व होमक्वारंटाईन झालेल्या मजुरांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहे. सरपंच समाधान तायडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठकीत हा ठराव घेण्यात आला असून ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी ठरावाच्या प्रती पंचायत समिती,तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याला दिल्या आहे.
होमक्वारंटाईन झालेल्या मजुराचे घराबाहेर असल्याचे छायाचित्र पुरविल्यास त्या व्यक्तीला पाचशे रु बक्षीस देण्याची तरतूदही या ठरावात करण्यात आली आहे. जरंडी गावात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागातून परवानगी घेवून येणाऱ्या मजुरांचा ओघ वाढला आहे. आरोग्य विभागाकडून मात्र युद्ध पातळीवर तपासणी करण्यात येत आहे व पुन्हा त्यांना १४ दिवस होमक्वारंटाईन करण्यात येत आहे.