CoronaVirus : रुग्णवाहीकेला सोळा हजार दिले; पॉझिटिव्ह रुग्णांचा जोगेश्वरीहून असा झाला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 07:52 PM2020-04-17T19:52:19+5:302020-04-17T19:54:42+5:30
ग्राउंड रिपोर्ट : गर्भवती महिला, मुलगा पाॅझिटीव्ह, पती हाय रिस्क असल्याने पुन्हा भरती करण्याच्या सूचना
- योगेश पायघन
औरंगाबाद ः राज्यभर लाॅकडाऊन, जिल्ह्यांच्या सिमांवर कडक तपासणी होत असुन स्क्रिनींग केली जात असल्याचा दिंडोरा पिटल्या जात आहे. मात्र, मुंबईहुन तिघे जण रुग्णवाहीकेतून गर्भवती महिलेला औरंगाबादेत घेवून आले. त्यांना सुमारे चारशे किलोमिटरच्या प्रवासात केवळ एकाच ठिकाणी अडवले. तेही केवळ गर्भवती महिलेची फाईल पाहुन सोडून दिले. सोबतच्या कुणाचीही विचारपुस करण्याची तसदी देखिल घेतली नाही. आई (वय ३०), वडील (वय ३५) व मुलगा (वय 17) अशा तिघांनी बायजीपुर्यात आजीच्या घरी तिन रात्री मुक्काम ठोकला. शेजार्यांनी तपासणीचा तगादा लावल्यावर ते कुटुंबिय स्वतःहुन जिल्हा रुग्णालयात गेले. त्यातील दोघे जण कोव्हीड१९ पाॅझिटीव्ह आल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे जिल्हाबंदी व लाॅकडाऊनमधील नाकाबंदी, स्क्रिनींगचा फज्जा उडाल्याचे समाेर आले आहे.
एकिकडे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आलेख उंचावत असतांना आरोग्ययंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यातच हाय रिस्क भागातुन येणार्यांची जिल्हा हद्दी व शहर हद्दींवर स्क्रिनिंग व नाकेबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र या दोन कोरोनाबाधितांमुळे समोर आले आहे. या कुटुंबीयांशी लोकमतने संवाद साधला. कोरोना पाॅझीटीव्ह महिलेचे पती व मुलाचे वडील म्हणाले, 'मी जोगेश्वरी पश्चिम क्रोसी कंपाउंड भागात किरायाच्या खोलीत राहतो. रिक्षा चालवून घरसंसार चालवतो. पत्नी नउ महिन्यांची गरोदर आहे. तिची आई औंरंगाबादेत राहते. त्यामुळे प्रसुतीसाठी आईकडे घेऊन येण्यासाठी व्यवस्था पाहत होतो. शुक्रवारी (दि. १०) एक रुग्णवाहीका रुग्णाला घेवून परिसरात आली होती. त्या चालकाला पत्नीला त्रास होत असल्याने औरंगाबादला घेवून जाण्यासाठी विचारले. त्याने सुरुवातीला वीस हजार रुपये सांगितले. शेवटी खुप विनवण्याकेल्यावर तो सोळा हजारात तयार झाला. ही रक्कम नेहमीच्या भाड्यापेक्षा दुप्पट आहे तरी लगेच पत्नी, पहिल्या पत्नीच्या मुलाला घेवून रुग्णवाहीकेने रवाना झालो. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निघलो. कोणत्या मार्गाने आलो माहीत नाही. मध्ये एका ठिकाणी डिझेल भरले. आणखी एका ठिकाणी थांबलो होतो. तर एका ठिकाणी अडवलेही होते. मात्र, ती जागा कोणती हे निश्चित सांगता येणार नाही. पण केवळ पत्नीचे कागदपत्रे पाहुन सोडून दिले. रात्री साडेआठच्या सुमारास बायजीपुरा येथे पोहचलो. शुक्रवारी रात्री, सोमवारी, रविवारी घरीच थांबलो. शेजार्यांनी तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही तिघे सोमवारी स्वत्ःहुन जिल्हा रुग्णालयात आलो. माझा अहवाल निगेटीव्ह तर पत्नी, मुलाचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने ते वरच्या मजल्याभर भरती आहे.' असे गर्भवती महिलेच्या पतीने लोकमतला सांगितले.
कोणत्या रस्त्याने आलो माहीत नाही
माझी बारा वर्षांची मुलगी व पतीच्या पहिल्या पत्नीचा सोळा वर्षांचा मुलगा तीन महिन्यांपासून आईकडेच राहत होते. मुंबईत माझे कोणी नसल्याने मी प्रसुतीसाठी ईकडे आले. बायजीपुर्यात भाऊ, त्याची पत्नी, त्याचे दोन मुलं, आई असा परिवार राहतो. त्या दिवशी खुप त्रास होत असल्याने मी कोणत्या मार्गे आले माहीत नाही. रात्री साडेदहा अकराला पोहचलो. आल्यावर एक दिवस आराम करुन दुसर्या दिवशी या रुग्णालयात भरती झाले. पतीच्या पहिल्या पत्नीचा मुलगाही ईथेच भरती आहे. मात्र, त्याची अजुन भेट झाली नाही. यांचीही तपासणी झाली. असे गर्भवती असलेल्या कोरोना पाॅझीटीव्ह महिलेने लोकमतला सांगितले. तर महिलेच्या भावाशीही लोकमतने संपर्क साधला त्यांनाही येण्यासंदर्भातील तपशील कळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेला प्रवासाचा तपशील मिळेना
महापाैर नंदकुमार घोडेले म्हणाले, गर्भवती महिला व त्यांचा मुलगा यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. डाॅ. सोनी या त्या परिवाराच्या व त्या परिसरातील तपासणीचे काम पाहत असुन संपर्कात आलेल्यांची माहीती संबंधीत ठिकाणी पोहचवण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डाॅ. सोनी म्हणाल्या, त्या महिला व मुलाने वेगवेगळा तपशील सांगितलेला आहे. मात्र,येण्याचा मार्ग, रुग्णवाहीकेचा चालक, थांबलेल्या ठिकाणांची माहीती मिळाली नाही. महापाैर व जिल्हाधिकारी यांनी कळवल्यानुसार महिलेच्या पतीला आज पुन्हा जिल्हा रुग्णालयात स्वतः लक्ष देऊन भरती केले आहे.
मुलगी प्रसुतीला आईकडे येण्याची आपल्याकडे प्रथाच आहे. सध्या मुंबई हायरिस्क भाग आहे. त्यामुळे महिला ईथे आल्याने निदान व उपचार दोन्ही योग्य पद्धतीने होतील. आई मुलासह वडिलांवर जिल्हा रुग्णालयात लक्ष ठेवून आहोत. पतीही हायरिस्क अल्याने पुन्हा भरती केले आहे.
- डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद
डॉक्टरांकडेच त्या महिलेची 'हिस्ट्री' मिळेल
कोरोना पॉझिटिव्ह आलेली महिला नुकतीच मुंबईहून औरंगाबादेत आली. त्यावेळी पोलिसांनी तिला शहरात कसे येऊ दिले किंवा तिला थेट तपासणीसाठी रुग्णालयात कानेले नाही, यासंदर्भात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले की, याबाबत तिच्यावर उपचार करणारे डॉक्टरच सर्व काही सविस्तर सांगू शकतील. त्यांच्याकडेच तिची 'हिस्ट्री' मिळेल.