coronavirus : 'ट्रेस-टेस्ट-आयसोलेट'मध्ये औरंगाबाद महापालिका देशात दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:26 PM2020-07-23T17:26:18+5:302020-07-23T17:33:28+5:30
औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे.
औरंगाबाद : कोविड-१९ मध्ये गत चार महिन्यांत महापालिकेने प्रगत तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केला. टीटीआय (ट्रेस-टेस्ट-आयसोलेट) म्हणजेच रुग्ण शोधणे, त्याची तपासणी करणे आणि वेळीच उपचार करणे यामध्ये औरंगाबाद शहराने देशात दुसरे स्थान पटकावले आहे. औरंगाबादेत ६६ हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत १ लाख तपासण्या पूर्ण होतील, असा विश्वास महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णवाढीची टक्केवारी २८ वरुन ११ टक्क्यांवर आली आहे. टीटीआयमध्ये गोवा राज्य प्रथम आहे.
दहा लाख नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून तपासणीचे हे गणित अधिक तपशीलवार समजावून सांगताना पाण्डेय यांनी नमूद केले की, दिल्लीत दहा लाख नागरिकांमागे ४३ हजार, जम्मू- काश्मीरमध्ये ३८ हजार, आंध्र प्रदेशमध्ये २५ हजार, राजस्थान १६ हजार, महाराष्ट्र १४ हजार नागरिकांच्या तपासण्या होतात. औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण आता ३.७ टक्क्यांवर आले आहे. मागील महिन्यात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण २८ टक्के होते. आता हे प्रमाण ११ टक्क्यांवर आले आहे.
कोरोनातील ७ प्रभावी कामे
औरंगाबाद महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्समध्ये आता ३५ कर्मचारी काम करीत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, मॅपिंग, हाय रिस्क रुग्णांचा शोध घेण्याची पद्धत इतर कोणत्याच महापालिकेत नाही. २४ तास ७ दिवस सतत कंट्रोल रूम सुरू असून, याद्वारे अनेक कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात येत आहेत. मोबाईल फिव्हर क्लीनिक, १ लाख ४ हजार ८७९ ज्येष्ठ नागरिकांवर वॉच ठेवण्याचे काम येथूनच होते. अनेकदा डॉक्टरसुद्धा त्यांना मार्गदर्शन करतात. एमएचएमएच अॅप तयार करून द्या, अशी मागणी राज्यातील पाच महापालिकांनी केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांची स्वतंत्रपणे तपासणी करणारी औरंगाबाद महापालिका एकमेव आहे.
खर्च ३ हजारांवरून ५०० रुपये
लाळेचे नमुने घेऊन तपासणी करण्याचा एका व्यक्तीचा खर्च तीन हजार रुपये आहे. अँटिबॉडीज टेस्ट या प्रकाराचा खर्चही ३ हजार रुपयांपर्यंत जात आहे. अँटिजन टेस्ट (आरटीपीसीआर) ५०० रुपयांमध्ये होत आहेत. भविष्यात व्यापारी आणि इतर विक्रेत्यांना ही टेस्ट ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्याने टेस्ट केलेली असेल, त्याच सुरक्षित व्यापाऱ्याकडून सामान खरेदी करावे, अशी औरंगाबादकरांना विनंती राहणार आहे.
अँटिजन टेस्टमध्येही औरंगाबाद आघाडीवर
औरंगाबाद महापालिकेने अत्याधुनिक आणि अत्यंत स्वस्त अँटिजन टेस्टचा वापर सुरू केल्यानंतर आता राज्यातील इतर महापालिकांनी यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. बाजारात कीट उपलब्ध नाहीत. सोलापूर महापालिकेला औरंगाबाद दहा हजार कीट उसने देणार आहे. ३१ जुलैपर्यंत औरंगाबाद शहरात एक लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झालेली असेल. व्यापाऱ्यांच्या २० हजार तपासण्यांमध्ये ५०७ पॉझिटिव्ह आढळून आले. सार्वजिनक ठिकाणे सुरक्षित राहावीत हा त्यामागचा उद्देश आहे. ३०० सलून चालकांची तपासणी केली. त्यामध्ये ९ पॉझिटिव्ह आढळून आले.
आजचा निगेटिव्ह, उद्या पॉझिटिव्ह असू शकतो
अँटिजन टेस्टबद्दल शहरामध्ये काही नागरिक भ्रम पसरवीत आहेत. आज एखाद्या नागरिकाची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी दुसऱ्या दिवशी उद्या त्याची टेस्ट पॉझिटिव्हसुद्धा येऊ शकते. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते.