दुकान उघडण्याबाबत व्यापाऱ्यांनी घाई करू नये; राज्य शासनाच्या आदेशाची वाट पाहावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:49 PM2020-04-25T13:49:57+5:302020-04-25T13:50:45+5:30
CoronaVirus lockdown : पुढील आदेश येईपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची घाई करू नये, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.
केंद्र सरकारने शनिवारपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली. लॉकडाऊनपुर्वीच दुकाने उघडण्याबाबत केंद्र सरकारकडून सुट देण्यात आली असली तर नियमांबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट निर्देश येत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडली जाणार नसल्याची भूमिका जिल्हा व्यापारी महासंघाने घेतली आहे. केंद्र सरकारच्या नव्या आदेशावर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेतली. यानंतर काळे यांनी सांगितले की, राज्य शासनाचे अद्याप आदेश आले नसून याबाबत दोन तीन दिवसात निर्णय होऊ शकतो. इतर दुकाने उघड्याबाबत राज्य शासन तथा जिल्हा प्रशासन सकारात्मक निर्णय घेतील अशी आहे. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत. सूट असलेली दुकाने पूर्वी प्रमाणेच सुरू राहतील मात्र इतर दुकानांबाबत राज्य शासनाचा निर्णय होई पर्यंत सर्वांनी वाट पहावी. घाई करू नये.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार होत्या. मात्र, आजपासून अन्य दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. आता अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत.