coronavirus : बालरुग्णांनी पालकांशिवाय घेतले उपचार; रुग्णालयात दाखवली लढाऊ वृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:41 PM2020-05-25T13:41:26+5:302020-05-25T13:49:01+5:30
औरंगाबादेत आतापर्यंत निदान झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये जवळपास ८ टक्के रुग्ण हे १० वर्षांखालील बालके आहेत.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वय जेमतेम १२ वर्षे. खेळण्या-बागडण्याचे दिवस. मात्र, याच वयात कोरोनाला सामोरे जाण्याची वेळ ओढवली. सारे जग कोरोनामुळे हादरलेले व सोबत आई-वडील नसतानाही अगदी हसत-खेळत एकट्याने उपचार घेतले आणि कोरोनावर मात केली. हीच लढाऊ वृत्ती दिसली रुग्णालयात एकट्याने उपचार घेतलेल्या अनेक बालकांमध्ये.
औरंगाबादेत आतापर्यंत निदान झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये जवळपास ८ टक्के रुग्ण हे १० वर्षांखालील बालके आहेत. यात बहुतांश बालकांचे आई, वडील आणि नातेवाईक पॉझिटिव्ह अथवा क्वारंटाईन. अशा परिस्थितीत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारीच पालक बनून बालकांची काळजी घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या १२ वर्षांखालील १८ बालके उपचारासाठी दाखल आहेत. शहरात २२ मेपर्यंत १० वर्षांच्या आतील कोरोना पॉझिटिव्ह बालरुग्णांची संख्या ही १०५ इतकी होती.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एखाद्या घरात रुग्णाचे निदान पॉझिटिव्ह होते, तेव्हा घरातील अन्य लोकांची तपासणी केली जाते. त्यात लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. शहरात पॉझिटिव्ह मुलांच्या उपचारासाठी निगेटिव्ह पालक स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णालयात थांबल्याचे पाहावयास मिळाले; परंतु आई, वडील, अन्य नातेवाईक पॉझिटिव्ह, क्वारंटाईन असल्याने मुलांच्या उपचारासाठी अनेक अडचणी उभ्या राहत असल्याचे दिसून येत आहे. एकाच रुग्णालयात पॉझिटिव्ह पालकही असतील, तर मुलांची काळजी घेता येते; परंतु मुले एका रुग्णालयात आणि पालक अन्य रुग्णालयात, अशीही परिस्थिती आहे. त्यामुळे मुलांच्या उपचाराची कसोटी डॉक्टर, परिचरिकांना पार पाडावी लागत आहे.
जे पालक मुलांसोबत थांबतात, त्यांचे समुपदेशन करून नेमकी कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले जाते, तर अनेक मुलांसोबत कोणीही नव्हते. त्यांची डॉक्टर, परिचारिकांनीच काळजी घेतली आणि घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात मुलांना चित्रकलेचा छंद जोपासण्यास सांगितले जात आहे. काळजीपोटी कुटुंबीय फोनवरून डॉक्टरांकडे मुलांविषयी विचारणा करतात, तेव्हा डॉक्टर मुलांविषयी माहिती देऊन त्यांचे समाधान करतात. डॉक्टर, परिचारिकांच्या पाठबळावर अनेक मुलांनी रुग्णालयात एकटेच राहून कोरोनावर विजय मिळविला. घाटीत कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या प्रसूतीनंतर डॉक्टर, परिचारिकाच नवजात शिशूची काळजी घेतात.
पालकांशिवाय घेतले उपचार
अनेक बालकांनी सोबत पालक नसताना यशस्वी उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. मुले हे खूप धावपळ करीत असतात. त्यांना खेळायचे असते. या सगळ्या गोष्टींबरोबर उपचार अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे यासाठी अनेक माध्यमांतून प्रयत्न केला जातो.
-डॉ. भारती नागरे, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय
दूध हे बाळासाठी महत्त्वपूर्ण
पॉझिटिव्ह गरोदर मातेच्या प्रसूतीनंतर शिशूची तपासणी केली जाते. आई पॉझिटिव्ह आणि नातेवाईक क्वारंटाईनमध्ये असतात. त्यामुळे डॉक्टर, परिचारिकाच शिशूची काळजी घेतात. आईचे दूध हे बाळासाठी महत्त्वपूर्ण आहे. योग्य काळजी घेऊन त्यास दूध पाजले जाते.
-डॉ. एल.एस. देशमुख, नवजात शिशू विभागप्रमुख, घाटी