coronavirus : आणखी दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 02:34 PM2020-07-10T14:34:29+5:302020-07-10T14:35:29+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७८६१ वर गेला आहे.
औरंगाबाद : शहरातील शासकीय रुग्णालय, घाटी येथे उपचारादरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ३३९ झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७८६१ वर गेला आहे. यासोबतच कोरोनामुळे मृत्यूचा आकडासुद्धा वाढत आहे. यामुळे जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री ८. ३० वाजता उस्मानपुरा येथील ७५ वर्षीय महिलेचा तर ११. ३० वाजता रहेमानगंज, जालना येथील रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज १६० बाधितांची वाढ
जिल्ह्यात शुक्रवारी १६० रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ७८३१ झाली आहे. त्यापैकी ४१६२ बरे होऊन घृ परतले आहेत. तर ३३९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३३३१ जणांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत ८६ पुरूष, ७४ महिला असून यात शहरी भागातील १२१ तर ३९ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले आहेत.