Coronavirus Unlock : दिलासादायक ! तब्बल तीन महिन्यांनंतर औरंगाबादमधून विमानाचे 'उड्डाण'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:41 PM2020-06-19T15:41:37+5:302020-06-19T15:45:13+5:30
या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादकरांची विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल ३ महिन्यानंतर शुक्रवारी इंडिगोच्या दिल्ली - औरंगाबाद विमानाने दुपारी २.२० वाजता ५१ प्रवासी शहरात दाखल झाले. तर २९ प्रवासी औरंगाबादहून दिल्लीला रवाना झाले. या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.
तब्बल ३-महिन्यांनंतर विमानतळ प्रवाशांच्या गर्दीने गजबजले. विमानतळावर दाखल प्रत्येक प्रवाशाच्या शरीराच्या तापमानाची विमानतळावर तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सायनिटायजर, फेश शिल्ड देण्यात आली. दुपारी ३.१० वाजता या विमानाने दिल्लीसाठी टेकऑफ घेतले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या ३ महिन्यांपासून विमानसेवा बंद होती. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली.
जुलै ऐवजी जूनपासून औरंगाबादहून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. उद्योग, व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर शुक्रवारपासून उड्डाण सुरू केले. हे विमान दिल्लीहून रोज दुपारी १२.२५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी २.२० वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर हे विमान दुपारी ३.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि सायंकाळी ५.०५ वाजता दिल्लीत दाखल होईल.