coronavirus रक्ताची नाही तर होते घशातील द्राव्याची तपासणी; राज्यात आहेत तीन प्रयोगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:43 PM2020-03-18T14:43:25+5:302020-03-18T14:44:59+5:30
कोरोनासाठी रक्ताची तपासणी केली जाते हा खोटा संदेश व्हायरल
औरंगाबाद : राज्यात कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( 'नसो फैरिंजीयल स्वाब' ) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे कोरोनासाठी रक्ताची तपासणी केली जाते या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाच्या निश्चितीसाठी संशियीतांची स्वाब तपसणी केली जाते. हा स्वाब रुग्णाच्या घशातील द्राव्याचा असतो. याची तपासणी राज्यात मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात केली जाते. सध्या रुग्णांचे नमुने येथे पाठविल्यानंतरच कोरोनाचे निदान होत आहे. आणखी काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहेत.
#CoronaVirusUpdate
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 18, 2020
कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही, रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो, त्यामुळे #कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा; आरोग्य विभागाचा महत्वाचा खुलासा#FactCheckpic.twitter.com/cmRf3OCMMv
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी असा खोडसाळ आणि चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.