Coronavirus: डॉक्टरांच्या आईचाच कोरोना चाचणीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येतो तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:27 PM2020-03-19T13:27:01+5:302020-03-19T13:30:21+5:30
आई पॉझिटिव्ह, मात्र पॅनिक झालो नाही, नागरिकांनीही घाबरू नये, सतर्क राहावे
औरंगाबाद : आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, आम्ही पॅनिक झालो नाही. उपचारामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नागरिकांनीही कोरोनाच्या प्रादुर्भावाला घाबरून जाऊ नये. सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन कोरोनाग्रस्त प्राध्यापिकेच्या डॉक्टर मुलाने पत्रकारांशी संवाद साधताना केले.
डॉक्टर म्हणाले, आईच्या प्रकृतीविषयी सामाजिक माध्यमांवर अफवा पसरविण्यात येत होत्या. त्यामुळे कुटुंब विचलित झाले होते. अशा अफवा पसरविता कामा नये. मी स्वत: आयसीयू स्पेशालिस्ट आहे. मुंबईत रुग्णालयात कोरोना नियंत्रणासंदर्भात तयारी सुरू होती. त्याच वेळी आई रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तात्काळ औरंगाबादला आलो. अहवाल पॉझिटिव्ह असला तरी उपचारामुळे आईच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुढील तपासणीसाठी आईचा स्वॅब घेतला जाणार आहे. खाजगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे ते म्हणाले. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र आले पाहिजे. कोणतीही भीती बाळगता कामा नये. खबरदारी घेण्यावर भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
प्राध्यापिकेचा घेतला पुन्हा स्वॅब
खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिके चा बुधवारी पुन्हा एकदा तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला आहे, अशी माहिती खाजगी रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णालयातून सुटी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु रुग्णाला सुटी देण्यासंदर्भात नवीन गाईडलाईन आलेली असून, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.