CoronaVirus : पुर्ण पगार मिळेल की नाही; मोलमजूरी करणाऱ्या महिलाही आर्थिक विवंचनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 06:58 PM2020-04-03T18:58:03+5:302020-04-03T18:58:26+5:30
६५ ते ७० टक्के घरांमध्ये मोलकरणींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
औरंगाबाद : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येकावरच झाला आहे. घराघरांमध्ये मोलमजूरी करून पोट भरणाऱ्या मोलकरणींनाही आता आर्थिक चिंतेने घेरले आहे. कारण लॉकडाऊनची घोषणा होताच जवळपास ६५ ते ७० टक्के घरांमध्ये मोलकरणींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ही सक्तीची सुटी कष्टकरी महिलांना नकोशी झाली आहे. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु झाला, दि. २३ रोजी सायंकाळी मुख्यमंंत्र्यांनी संचारबंदीची आणि २४ रोजी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासूनच बहुतांश घराचे दरवाजे मोलकरणींसाठी बंद झाले. घरकाम करायला येणारी एक महिला आणखी दोन- चार घरची कामे करून येते. त्यामुळे या महिलांपासूनही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच धास्तीने अनेक घरांमध्ये महिलांनी कामाला येणाऱ्या महिलांना सुटी देऊन घरातली सगळी कामे स्वत:च करायला सुरूवात केली आहे. अशीच परिस्थिती पुढील काही महिने कायम राहिली तर येणाºया आर्थिक संकटाला कसे तोंड द्यायचे, हा प्रश्न आता या महिलांना पडला आहे.
पगार देऊ, पण किती महिने
घरोघरी जाऊन मोलमजूरी करणाऱ्या महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी घरी थांबणेच योग्य आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून सुट्या गृहित न धरता या महिन्याचा पगार तर बहुतांश घरांमधून त्यांना दिला जाणार आहेच. पण सध्या दि. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची परिस्थिती आहे. मग अर्धा महिना सुटी झाली तरी एप्रिल महिन्याचा पगारही पुर्ण द्यायचा का, असा प्रश्न आहे. याशिवाय पुढील २ ते ३ महिने अशीच परिस्थिती राहिली आणि त्या महिलांना कामावर येता आले नाही, तर आम्हालाही विचार करावा लागेल. कारण या लॉकडाऊनचा परिणाम आमच्याही उत्पन्नावर नक्कीच होणार आहे, असे काही गृहिणींनी सांगितले.
घरखर्च भागवणे कठीण होत आहे
घरात आम्ही ८ ते १० लोक आहोत. प्रत्येकाच्याच कामावर परिणाम झाला आहे त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण होत आहे. काही घरांमध्ये आमचा पगार कापणार नाही, असे सांगितले आहे. पण पुढे काही महिने असेच चालू राहिले, तर आम्हाला तरी बिना कामाचा पगार लोक किती महिने देतील. त्यामुळे आम्हालाही चिंता पडली आहे, असे घरकाम करणाऱ्या अलका खंडागळे यांनी सांगितले.